विधानसभा निवडणुकीत पैशांचा पूर आला. पैसे वाटपाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. त्यावर तीव्र संताप व्यक्त करत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी 95 वर्षीय योद्धा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा फुले वाडा येथे गुरुवारपासून आत्मक्लेश उपोषण आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. राज्यात सर्वच जिह्यांत उद्या या उपोषणाच्या समर्थनार्थ लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्य संस्थेद्वारेच लोकशाहीला नख लागत असून संविधानिक मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. विधानसभा निवडणुकांत झालेला पैशाचा वापर आणि भ्रष्टाचारी अदानींना केंद्र सरकार देत असलेल्या पाठिंब्यामुळे तर याचा कळस गाठला गेला आहे. लोकशाही रक्षणाची व संविधानानुरूप देश घडवण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे. त्यामुळे डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन सुरू केले आहे.
महात्मा फुले वाडय़ात उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची आज रीघ लागली होती. यात ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी, आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, किरण मोघे, मेधा थत्ते, शेकापाचे नेते भाई संपतराव पवार, धनाजी गुरव, अॅड. एल. टी. सावंत, जलतज्ञ डॉ प्रदीप व विद्या पुरंदरे, मानव कांबळे, अश्विनी कदम, साम्यवादी नेते अॅड. नाथा शिंगाडे यांसह शेकडो नागरिकांचा यामध्ये समावेश होता.
सरकारच्या भूमिकेविरुद्ध नागरिकांनी उभे राहिले पाहिजे
डॉ. बाबा आढाव म्हणाले, निवडणूक प्रकियेमधील नागरिकांच्या आणि विरोधकांच्या शंकाचे निरसन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती जबाबदारी सरकार जर टाळत असेल तर सरळच सरकारला विरोधकांशिवाय एकाधिकार देणारी लोकशाही हवी आहे असेच म्हणावे लागेल. अशावेळी नागरिकांनी जबाबदार व्हावे आणि सरकारच्या भूमिकेविरुद्ध उभे ठाकावे.
डॉ. बाबा आढाव व त्यांचे सहकारी नितीन पवार, गोरख मेंगडे यांनी गुरुवारपासून सुरू केलेल्या तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषण आंदोलनाला पहिल्या दिवसापासून राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सातारा येथे तीन दिवसांचे आत्मक्लेश उपोषण कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. नगर, परभणी, श्रीगोंदा, छत्रपती संभाजीनगर येथे पाठिंबादर्शक उपोषण करण्यात आले. उद्या ‘भारत जोडो’ अभियानाच्या वतीने राज्यातल्या जवळपास सर्व जिह्यांत आत्मक्लेश लाक्षणिक उपोषण केले जाईल. ठाणे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदना शिंदे यांच्यासह आणखी दोन कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा देत लाक्षणिक उपोषण केले.