आरोग्य – मनाचे डिजिटल शुद्धीकरण

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी

सोशल मीडियामुळे मिळणारे डोपामाईन म्हणजे छान छान वाटण्याचे हार्मोन इतके हवेहवेसे वाटते आणि सवयीचे होते की दर पाच पाच मिनिटांनी मोबाईल उघडून बघावासा वाटतो. मात्र हळूहळू या सवयीचे आपण गुलाम होतो. यासाठे मनाचे डिजिटल शुद्धीकरण गरजेचे आहे. 

शरीराच्या शुद्धीबरोबरच मनाची शुद्धीही तितकीच महत्त्वाची. एक आठवडय़ापूर्वी एक तिशीतला अविवाहित तरुण माझ्या पंचकर्म क्लिनिकमध्ये आला. चेहऱयावर चिंता जाणवत होती. त्याला शांत बसवल्यावर नाडी परीक्षा आणि इतर तपासणी केल्यावर असे लक्षात आले की, त्याला विशेष गंभीर आजार नाही. त्यांनी आणलेले रिपोर्ट पण तो निरोगी असल्याचा निर्वाळा देत होते. परंतु त्याचे म्हणणे होते की, लघवी साफ होत नाही. गेली कित्येक वर्षं तो अनेक डॉक्टरांकडे जाऊन आला व शेवटी आयुर्वेदाकडे म्हणजे माझ्याकडे आला.

मी ‘काय होते ते नीट सांग’ असे सांगितल्यावर त्याने डोळ्यात पाणी आणून मला त्याची कथा सांगायला सुरुवात केली. त्या कथेबरोबरच पुरावा म्हणून गुगलवर काढलेली माहिती छायाचित्रे दाखवत होता. त्याचा अर्थार्थी त्याच्या आरोग्याशी काही संबंध नव्हता. शेवटी म्हणाला की, “मला टेन्शन आलंय. माझं लग्न ठरतंय आणि हे काही बरं होत नाही.”

मी त्याला म्हटलं, “तुला औषधापेक्षा डिजिटल डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे. त्यासाठी आधी हा मोबाईल बंद करून ठेव.”

तो मंद हसला, “हे कसं शक्य आहे सर. माझं सगळं कामच त्याच्यावर आहे. व्हॉट्सअप बघावे लागते. कॉल घ्यावे लागतात.”

“मी मग तेवढेच कर बाकीचे अॅप काढून टाक.” त्याने मान डोलावली. बाकीच्या काही वाताच्या लक्षणांसाठी बस्ती कर्म केले आणि मानसोपचारासाठी आयुर्वेदिक औषधे दिली. 15 दिवसांनी तो प्रफुल्लित चेहऱयाने आला आणि म्हणाला, “धन्यवाद सर, आता मी पूर्ण बरा आहे. लग्न ठरले आहे. तुम्हाला नक्की यायचंय.”

15 दिवसांत एवढा बदल मी आश्चर्यचकित झालो. तर हे डिजिटल डिटॉक्सिफिकेशन हा तसा सोपा उपाय नाही. खूप प्रयत्न करावे लागतात. या सोशल मीडियामुळे मिळणारे डोपामाईन म्हणजे छान छान वाटण्याचे हार्मोन इतके हवेहवेसे वाटते आणि सवयीचे होते की दर पाच पाच मिनिटांनी मोबाईल उघडून बघावासा वाटतो. सकाळी डोळे उघडले की मोबाईल, टॉयलेटमध्ये मोबाईल, सगळे गप्पा मारत बसले असताना पण मोबाईल, खाताना मोबाईल, झोपताना मोबाईल. हे व्यसन खूप वाढत चाललंय. तंबाखू, दारूप्रमाणे हे वाईट व्यसन आहे अशी भावनाही अजून समाजात पसरलेली नाही. यावर आपल्या परीने लवकरात लवकर उपाय करणे गरजेचे आहे नाहीतर त्याचे दुष्परिणाम भयंकर आहेत.

निपियता – एका चॉकलेटच्या जाहिरातीत असे दाखवले आहे की तो तरुण काही करत नाही म्हणून कुत्र्याची पिल्ले वाचतात. लिफ्टमध्ये डेड बॉडी जिवंत होते. ते ‘काहीही न करणे’, ‘नुसते बघत राहणे’ हे तरुण पिढीत वाढत चाललंय कारण त्यात भाग घेणे हे मोबाईलमध्ये शिकवतच नाहीत. ‘फक्त बघा’ ही निपियता घातक आहे.

नवनिर्मितीचा अभाव – नवीन कल्पना न सुचणे, नवीन कविता कथा लिहिणे असे नवनिर्मितीची साधने मोबाईलच्या अतिवापरामुळे बधीर झाली आहेत.

एकाग्रताभंग – पूर्वीच्या काळी रेडीओवर श्रुतिका ऐकताना आपण मनात सगळं चित्र उभं करायचो. केवढे मनोरंजन होते. आता सगळं आयतं बघायला मिळते. यामुळे एकाग्रता करणे कठीण होत चाललंय.

एखादं काम पूर्ण करणं मोबाईल व्यसनी माणसाला शक्य होत नाही, मानसिक थकवा येतो. एखादी एक ते दीड तासाची फिल्म एका ठिकाणी बसून बघू शकत नाही. एखादं पुस्तकाचं पान वाचू शकत नाही, लगेच मोबाईल उघडून बघावासा वाटतो, हे दुष्परिणाम वाढत चालले आहे.

एकलकोंडेपणा – आठवडेच्या आठवडे मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना न भेटणे, घरात जेवताना वावरताना घरच्यांशी दोन शब्द नीट न बोलणे असे वागणुकीत बदल दिसू लागतात. लोकलमध्ये एवढय़ा गर्दीत प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये एकलकोंडा प्रवास करताना बघून अतिशय वाईट वाटते. त्याचा परिणाम पुढे डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्यात होतो. तासन्तास रील पाहिले जातात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तसेच काही सोशल मीडियावर पोर्न अगदी सर्रास उपलब्ध झाले आहे. त्यामुळे लहान मुलांवरील ते काय बघतात यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

यावरील उपाय :

– छोटे साध्य ठेवा. पहिल्या दिवसातून एक तास, नंतर पूर्ण दिवस, नंतर एक आठवडा पीन बघणार नाही असा निश्चय करा आणि अमलात आणा.

– ट्रेकिंग, स्विमिंग, योग, पुस्तक वाचन, शेतात व बागेत काम करणे, स्वयंपाक असे अनेक छंद जोपासा. त्याने चांगले हार्मोन्स् शरीराला मिळतील आणि आनंदी राहाल.

– या वाईट सवयींना आळा घालण्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम आणि लिखाण अशा ािढया अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात.

– स्वतला मोबाईलपासून दूर राहिल्याबद्दल शाबासकी द्या. उदाहरणार्थ आवडत्या हॉटेलात जेवण, चांगला सिनेमा बघणे इत्यादी.

– व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. सूर्यनमस्कार, योगासन करणे आवश्यक आहे.

– मित्र-मैत्रिणीबरोबर गप्पा करणे, कुटुंबाबरोबर संवाद साधणे, प्रवासात राजकारण सोडून इतर चांगल्या गप्पा मारणे, चांगले संगीत ऐकणे, एखादे वाद्य वाजवायला शिकणे असे सोपे उपाय करावे.

तेव्हा लवकरात लवकर आपली सुटका मोबाईलच्या पारतंत्र्यातून करा आणि खरे स्वातंत्र्य मिळवा.

[email protected]