प्रेरणेच्या पायवाटा- प्रेरणादायी हलधर नाग

>> डॉ. अनिल कुलकर्णी

काही जण अनुभवाच्या आधारे स्वतला सिद्ध करतात, काही पुस्तके वाचून यश संपादन करतात, काही पुस्तकांच्या पलीकडे जाऊन अनेक बाबींचं निरीक्षण करून स्वत उमलवयाचा प्रयत्न करतात. काही जण अनेकांच्या प्रेरणेच्या पायवाटा यावरून मार्गक्रमण करतात आणि म्हणूनच ते आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करू शकतात.

काहींचं अस्तित्व आपलं जीवन बदलून टाकतात. समाजात होऊन गेलेल्या अनेक थोर माणसांच्या कर्तृत्वामुळेच ,अस्तित्वामुळेच आजही समाज त्या पाऊल वाटेवरून पुढे मार्गक्रमण करतो. पाऊलखुणा चालण्यासाठी पायवाट निर्माण करतात आणि पायवाट असली की माणसे भरकटत नाहीत. जाणीवपूर्वक काही मूल्यं शिकवावी लागतात. रुजवावी लागतात. आपण कोणासाठी तरी दखलपात्र आहोत व आपली मूर्ती कोणाच्यातरी हृदयात असावी हे वाटणं हीच जगण्याची शिदोरी असते. माणसात देव पाहता आला की मंदिर बंद असलं तरी चालतं. अशी माणसे जी आपल्याला साधेपणातून सुद्धा, साध्या राहण्यातून सुद्धा उच्च विचारसरणी देतात.

नैराश्याच्या गर्तेत अनेक जण आज आपले आयुष्य संपवीत आहेत पण आपल्याकडे जे नाही त्यापेक्षा जे आहे त्याच्यावर जर प्रेम करायला माणसे शिकली तर व्यक्तिमत्त्वाचा कायापालट होतो. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे हलधर नाग. काही व्यक्तीकडे पुरस्कार चालून येतात. दिल्लीला येण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे पुरस्कार पोस्टाने पाठवून द्या असे म्हणणारे हलधर नाग यांना पद्मश्रीनंतर नुकतेच पद्म विभूषण या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. हलधर नाग यांनी अनेक संकटांचा सामना करत केवळ समाजात स्वतला सिद्ध केले नाही तर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. तिसरीतून ड्रॉप आऊट झालेल्या या कवीवर पाच जणांनी पी.एचडी केली आहे.

1950 मध्ये ओडिशाच्या बारगड जिह्यात हलधर यांना जन्म एका गरीब कुटुंबात झाला. मोठय़ा मुश्किलीने ते तिसऱया वर्गापर्यंत शिक्षण घेऊ शकले. हलधर 10 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी शाळा सोडली कारण घराची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. त्यांनी एका मिठाईच्या दुकानात दोन वर्षे भांडी विसरण्याचे काम केले. गावातील सरपंचाने त्यांना शाळेत स्वंयपाक्याचे काम दिले. तिथे 16 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी थोडे कर्ज घेऊन एक स्टेशनरी दुकान सुरु केले. शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या-पुस्तके आणि इतर साहित्याचे ते दुकान होते.

याच काळात त्यांच्या मनात कविता जन्म घेत होती. त्यांना लिहिण्याची गोडी निर्माण झाली होती. त्यांची पहिली कविता ‘धोनो बरगच्च‘ (जुने वडाचे झाड) 1990 मध्ये स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झाली. त्यानंतरही त्यांच्या काही कविता वृत्तपत्र, नियतकालिकातून प्रकाशित झाल्या. त्यांना त्यांच्या सर्व कविता आणि महाकाव्य तोंडपाठ आहे. त्यांच्या कवितेची कोणतीही ओळ सांगितली तर ते त्यापुढील कविता म्हणायला लागतात. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात नाग यांच्या कविता आहेत. रंग, देहयष्टीने सर्वसाधारण असलेले हलधर यांनी अजून पायात चप्पल किंवा बूट घातलेला नाही. त्यांचा पोषाखही सामान्यच आहे. धोतर आणि बंडी एवढे अंग झाकण्यासाठी पुरेसे आहे आणि तोच त्यांचा पेहराव आहे.

नाग म्हणतात, एका विधवेच्या मुलाचे आयुष्य अतिशय कठीण असते. प्रत्येक वेळेस नवे आव्हान आणि संकट तुमची वाट पाहात असते. त्यांच्या कविता आता देशातील कित्येक विद्यापीठांमध्ये शिकवल्या जात आहेत. संबलपूर विद्यापीठाने ‘हलधर ग्रंथावली-2‘ मध्ये त्यांच्या प्रसिद्ध कविता संग्रहित केल्या आहेत. त्यांनी प्रामुख्याने, समाज, धर्म, कला, संस्कृती आणि निसर्गावर कविता केल्या आहेत. 66 वर्षांचे हलधर नाग यांनी त्यांचे साहित्य कोसली भाषेत लिहिले आहे. त्यांच्या अनेक कविता आणि 20 महाकाव्य आहेत.

दिव्याखाली अभ्यास करून यशश्री खेचून आणणाऱयांनी स्वतची ओळख निर्माण केली. आज पायवाट निर्माण करणाऱयांच्या गावीही नसते की आपण प्रेरणेची पायवाट निर्माण करत आहोत. विद्यार्थ्यांनी सुद्धा काही गोष्टीचा हट्ट न धरता आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये कसे शिकता येईल याचा विचार करायला हवा. सुखावून अभ्यास होत नाही तर तावूनसुलाखून अभ्यास होतो. महात्मा गांधींनी म्हटलं होतं, My life is my message. त्यांच्या प्रत्येक कृतीतून समाजाला संदेश मिळाला. हलधर नाग यांच्यापासून सुद्धा आम्हाला बरेच शिकण्यासारखा आहे. व्यक्तीमधील सगळ्याच बाबींचं अनुकरण आपण करू शकत नाही, पण प्रत्येक व्यक्तिमत्त्वामधील काही काही बाबींचं अनुकरण जर केलं तर आपलं व्यक्तिमत्त्व निश्चित समृद्ध होतं.

[email protected]