
देशातील आघाडीचे गॅस्ट्रोएण्टरोलॉजिस्ट आणि मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील इन्स्टिटयुट ऑफ गॅस्टेरोसायन्स विभागाचे प्रमुख पद्मश्री डॉक्टर अमित मायदेव यांचा आरोग्य क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल अमेरिकन सोसायटी फॉर गॅस्ट्रोएण्टरोइन्टेस्टायनल एण्डोस्कोपीच्या वतीने दिल्या जाणाऱया मास्टर एण्डोस्कोपिक या प्रतिष्ठsच्या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. गॅस्टेरोइन्टेस्टायनल एण्डोस्कोपी अॅट डायजेस्टिव्ह सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
एडव्हान्स एण्डोस्कोपी किंवा दुर्बिणीद्वारे एण्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा असून यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन अमेरिकन सोसायटीच्या वतीने त्यांना गौरवण्यात येणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे तसेच एण्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात त्यांनी नाविण्यपूर्ण आणि अलौकिक अशी कामगिरी केली आहे. डॉ. मायदेव यांनी केवळ हिंदुस्थानातील वैद्यकीय क्षेत्रातच नाही तर जागतिक पातळीवर आपली छाप सोडली. एण्डोस्कोपीमध्ये रुग्णांची काळजी, वैद्यकीय शिक्षण आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांची सांगड घालून त्यांनी केलेले अथक परिश्रम आणि समर्पण यासाठी त्यांचा सन्मान होणार आहे.
जबाबदारी वाढली
या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली असून रुग्णांप्रति असलेली वचनबद्धता आणखी मजबूत झाली आहे, अशा शब्दांत डॉ. अमित मायदेव यांनी अमेरिकन सोसायटी फॉर गॅस्ट्रोएण्टरोइन्टेस्टायनल एण्डोस्कोपीचे आभार मानले आहेत. आणखी नाविण्यपूर्ण कामगिरी आणि रुग्णांना उत्तम उपचार देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर तरंग गियानचंदानी यांनी पुरस्काराबद्दल डॉ. अमित मायदेव यांचे अभिनंदन केले आहे. सर एच एन रिलियन्स फाऊंडेशन आणि हिंदुस्थानातील वैद्यकीय क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.