डॉ. आंबेडकर विधी कॉलेजला उपविजेतेपद

पहिल्या सामन्यापासून जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या डॉ. आंबेडकर विधी कॉलेजला विजेतेपदाने हुलकावणी दिली. विधी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यू लॉ कॉलेजने अवघ्या 11 धावांनी विजय मिळवत जेतेपदावर आपले नाव कोरले.

एमसीए व न्यू लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा पहिल्यांदाच विधी चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील 12 कॉलेजच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय व न्यू लॉ कॉलेजने एकही सामना न गमावता सर्वोत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. एमसीएच्या बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये जोरदार संघर्ष झाला. प्रथम फलंदाजी करताना न्यू लॉ कॉलेजने 152 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल 153 धावांचा पाठलाग करताना डॉ.आंबेडकर कॉलेजचा डाव 141 धावांत आटोपला. जेतेपद हुकले असले तरी डॉ. आंबेडकरचा कर्णधार रोशन मोरे (उत्कृष्ट गोलंदाज), स्वप्निल चव्हाण (उत्कृष्ट क्षेत्ररक्षक) यांनी वैयक्तिक पुरस्कार जिंकले. दिपक गीते आणि निखील जाधव यांनीही वैयक्तिक पुरस्कार काबीज केले. न्यू लॉ कॉलेजच्या जयेश म्हात्रेनेही (उत्कृष्ट फलंदाज) पुरस्कार पटकावला. स्पर्धेचा पुरस्कार सोहळा एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, सहसचिव दिपक पाटील, न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्या शिवानी शेलार यांच्या हस्ते खेळाडूंना गौरविण्यात आले.