दिवसा रुग्णांवर उपचार; रात्री यूपीएससीचा अभ्यास, राजस्थानच्या डॉक्टरची प्रेरणादायी कहाणी आली समोर

इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर काहीही शक्य आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. राजस्थानच्या डॉ. अदिती उपाध्याय यांची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. मूळच्या उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रहिवासी असलेल्या अदिती यांनी सर्वात आधी बीडीएसचे शिक्षण घेतले आणि त्या डॉक्टर झाल्या. मात्र यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.

नागरी सेवेत सामील होऊन देशाची सेवा करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्या दिवसा रुग्णांवर उपचार करायच्या, तर रात्री यूपीएससीची तयारी करायच्या. त्यांनी आपले असे रुटीन सेट केले होते. त्यासाठी त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली नाही. केवळ ऑनलाइन उपलब्ध असलेल्या मटेरियलचा आधार घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात 127 वा रँक मिळवला.

मुलाखतीपूर्वी नोकरी सोडली

मुलाखतीपूर्वी त्यांनी डॉक्टरची नोकरी सोडली होती. जेणेकरून त्यांना संपूर्ण लक्ष मुलाखतीवर केंद्रित करता येईल. अदिती सध्या राजस्थान केडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून सेवा देत आहेत. त्यांचा प्रवास केवळ करीअर बदलणाऱ्यांसाठीच नाही तर तरुणांसाठीही एक संदेश आहे. तुमची स्वप्न तुम्ही कधीही बदलू शकता. केवळ कठोर परिश्रमाची आवश्यकता असून केवळ तयारी आणि हेतू खरा असला पाहिजे असे डॉ. अदिती उपाध्याय सांगतात.