पामबीच मार्गावरील डीपीएस तलाव संरक्षित क्षेत्र घोषित, फडणवीसांची एकनाथ शिंदेंवर कुरघोडी

नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील डीपीएस तलाव हा ‘संरक्षित क्षेत्र’ म्हणून आज घोषित करण्यात आला. राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. हा तलाव संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याची आवश्यकता असल्याचे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी बैठकीत व्यक्त केले.

राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत नाईक यांनी आयत्या वेळी हा विषय मांडला. कारण नेरूळ सीवूड येथील अनिवासी संकुलाच्या जवळ असलेल्या या तलावात फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवास व कांदळवन आहे. या मागणीनंतर फडणवीस यांनी ही घोषणा केली. मुंबईतील पामबीच मार्गालगत डीपीएस शाळेजवळ हा तलाव आहे. तलावात गेली अनेक वर्षे नैसर्गिकदृष्ट्या जवळच्या खाडीचे पाणी येत आहे. कमी पाणी आणि मुबलक खाद्य उपलब्ध होत असल्याने फ्लेमिंगोचे थवेच्या थवे या तलाव क्षेत्रात दिसून येतात. ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक व पक्षी अभ्यासकांची गर्दी या तलाव क्षेत्रात होते. नेरूळ ते भाऊचा धक्का जलवाहतूक सेवा सुरू करताना सिडकोच्या वतीने बांधण्यात आलेल्या जेट्टीमुळे या तलाव क्षेत्रात येणारे खारे पाण्याचे मार्ग बंद होऊन फ्लेमिंगोंचे वास्तव्य संकटात आले. या भागातील कांदळवनदेखील नष्ट करण्यात आले.

सिडकोमध्ये एकनाथ शिंदेंना शह

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सिडकोचा हा विस्तीर्ण भूखंड ‘संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित करून मुख्यमंत्री फडणवीस व गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर मात केल्याची चर्चा आहे.