चंद्रपुरात कापूस उत्पादकावर दुबार पेरणीचे संकट

पावसाळा सुरू होऊन 18 दिवस उलटले. मात्र जिह्यात दमदार पाऊस बरसला नाही. शेतकऱयांनी कापसाची धूळ पेरणी केली. मागील चार दिवसांत जिह्यातील काही भागांत तुरळक पाऊस झाला खरा, मात्र तापमानाचा आकडा 40 अंशांच्या कमी झालेले नाही. ज्या शेतकऱयांनी सुरुवातीलाच कापसाची पेरणी केली. त्या शेतात अंकुर फुटले आहेत. वातावरण असेच राहिले तर दुबार पेरणीचे संकट ओढावेल ही चिंता बळीराजाला सतावत आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार मान्सून लवकर येईल या आधारावर जिह्यातील जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱयांनी कापसाची लागवड केली. पाऊसच आला नसल्यामुळे बियाणे उगवण्याची शक्यता मावळत आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत असल्याच चित्र जिह्यात निर्माण झाले आहे. विदर्भात मान्सून अद्यापही सक्रिय झाला नाही याचे कारण सांगताना प्राध्यापक सुरेश चोपणे म्हणाले, गेल्या दशकापासून मान्सून 15 दिवस पुढे गेला आहे त्यामुळे जूनमध्ये फारसा सशक्त दिसत नाही. विशेषतः अरबी समुद्राकडून येणारे मान्सून वारे कमजोर असतात तर विदर्भात बंगालच्या खाडीकडून येणारे वारे पाऊस घेऊन येत असतात असे चित्र आहे.