Neeraj Chopra Marriage – ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्राचं होतंय कौतुक, हुंड्यात घेतला फक्त 1 रुपया!

हिंदुस्थानचा ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने नुकतेच गुपचूप लग्न केल्याचे समोर आले आहे. उत्तम खेळाडूबरोबरच तो त्याच्या साधेपणासाठीही ओळखला जातो. 16 जानेवारी रोजी नीरज हिमानी मोर सोबत विवाहबंधनात अडकला आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. स्टार खेळाडू असूनही त्याने लग्नात कोणताही थाट न ठेवता अगदी साधेपणाने लग्न केले. या लग्नाचे वेगळेपण म्हणजे नीरजने लग्नात शगुन एवढा हुंडा घेतला की सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

बऱ्याच ठिकाणी लग्नात मुलींच्या घरच्यांकडून हुंडा घेण्याची पद्धत आहे. पण नीरजने त्याच्या लग्नात शगुन म्हणून एक रुपया घेतल्याचे त्याचे काका सुरेंद्र चोप्रा यांनी सांगितले. त्याचे लग्न अगदी गुप्त ठेवण्यात आले होते आणि लग्नाला जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. हा विवाह सोहळा प्रेमविवाह नसून अरेन्ज मॅरेज असल्याचे दोन्ही कुटुंबियांकडून सांगण्यात आले. हिमानीच्या आईने सांगितले की, दोन्ही कुटुंब गेल्या सात आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यामुळे नीरज आणि हिमानी दोघांच्या संमतीनंतर हे लग्न ठरविण्यात आले.

लग्नानंतर नीरज आणि हिमानी लगेच अमेरिकेला रवाना झाले. हिमानी नोकरीसोबतच अमेरिकेत शिकत असल्याचे तिच्या आईने सांगितले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना 20 जानेवारीपूर्वी तेथे पोहोचावे लागेल, अशी सूचना देण्यात आली होती आणि याच कारणासाठी दोघेही अमेरिकेला गेले आहेत. नीरजची पत्नी हिमानी मोर हरयाणाची रहिवासी असून ती टेनिसपटू आहे. हिमानी सध्या अमेरिकेच्या फ्रँकलिन पियर्स विद्यापीठातून स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. याआधी तिने दिल्लीतील मिरांडा हाऊसमधून राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षणात पदवी घेतली आहे.