
मुंबईत महागाईने अक्षरशः कहर केला असून भाज्यांनी डबल सेंच्युरी केली आहे. वाटाणा, फरसबी तब्बल 200 रुपये किलोच्या घरात गेली असून भेंडी, घेवडा, टोमॅटोनेही शंभरी पार केली आहे. कडधान्यांचे दरही चांगलेच कडाडले असून इंधनाचे दरही आवाक्याबाहेर गेलेत. त्यामुळे जगायचे कसे आणि खायचे काय, असा यक्षप्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे. जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. त्यामुळे मुंबईकरांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला तर बळीराजासाठी ही आनंदाची बातमी ठरली. परंतु, आता महागाईने चिंता वाढवली असून, ‘मोदी है तो महंगाई भी मुमकीन है’ असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प येत्या 23 जुलै रोजी मांडण्यात येणार आहे. अर्थसंकल्पाच्या आधी हलवा वाटून आनंदोत्सव साजरा केला जाईल. नेहमीप्रमाणेच या अर्थसंकल्पात मोठमोठय़ा घोषणांचा पाऊस पडेल, परंतु महागाईचे काय? यातून आम्हाला दिलासा मिळणार आहे का? की दरवर्षींप्रमाणे यावेळीही घोषणांचे गाजर दाखवणार, असा सवाल जनता करत आहे.
टोमॅटो 100 तर वाटाणा 200 रुपये किलो
भाज्यांचे तसेच कडधान्याचे दर कडाडले आहेत. 30 ते 40 रुपये किलोने मिळणारा टोमॅटो तब्बल 100 रुपये किलोने मिळत आहे तर वाटाण्याचे दरही 200 रुपयांवर गेले आहेत. भाज्यांचे दर 20 टक्क्यांनी वाढल्याची माहिती प्रभादेवीच्या मंडईतील भाजीविव्रेते सूर्यकांत कांदरफळे यांनी दिली. कांदा आणि बटाटय़ाचे दरही 5 रुपयांनी वाढले आहेत. कडधान्याचे दरही वाढल्याचे एस. के. शॉपच्या देवेंद्र शुक्ला यांनी सांगितले.
पाणीपट्टी महागली, भाज्या कडाडल्या, मांसाहारही महागेल… मग अशावेळी आम्ही सर्वसामान्यांनी खायचे काय? निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? वापरा आणि फेपून द्या असेच सरकारचे धोरण आहे का?
– आशा शेलार, गृहिणी
मोदी सरकारला निवडणुकीत जोरदार दणका बसला. कुबडय़ा घेऊन सरकार स्थापन करावे लागले. याचाच सूड सरकार आमच्यावर उगवतेय का? सणवार सुरू होतील अशावेळी आम्ही सर्वसामान्यांनी काय करायचे, असा प्रश्न आहे.
– मनीषा काळे, गृहिणी
दर (किलोमागे) आधी आता
- भेंडी 60 100
- आले 160 200
- फरसबी 160 200
- घेवडा 100 120
- वाटाणा 160 200
- टोमॅटो 60 100
- फ्लॉवर 60 80