पक्ष्यांवरील पतंगाच्या मांजाची ‘संक्रांत टाळा’, ‘स्पॅरोज शेल्टर’चे आवाहन

मकर संक्रांत हा पर्वकाळ म्हणजे विशेष पुण्यकाळ मानलेला आहे. म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. संक्राती दिवशी उडवल्या जाणाऱ्या पतंगाच्या धारदार मांजामुळे चिमण्या तसेच इतर पक्षी जखमी होतात. यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, असे आवाहन ‘स्पॅरोज शेल्टर’ या चिमण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी केले आहे.

शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे पक्ष्यांची संख्या आधीच कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कमीत कमी पतंग उडवून व धारदार मांजाचा वापर टाळून पक्ष्यांना वाचवण्यासाठी हातभार लावावा. त्याऐवजी तीळगुळ वाटून संक्रांत साजरी करावी, असे आवाहन ‘स्पॅरोज शेल्टर’ने केले आहे.   

चायनीज मांजा घातक  

चायनीज मांजाला अत्यंत धार असल्याने पक्षी जखमी होण्यासह त्यांचा बळीही जाऊ शकतो. पतंग उडवताना चायनीज मांजा वापरणे गंभीर गुन्हा असून सरकारने अशावर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी विनंती संस्थेने केली आहे. केवळ मकरसंक्रांती दिवशीच नाही तर नंतरदेखील झाडांना लटकलेल्या मांजामध्ये पक्षी अडकून जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे.

जखमी पक्ष्यांसाठी संपर्क करा!

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना जखमी पक्षी आढळून आल्यास तसेच इतर दिवशीही जखमी पक्षी आढळून आल्यास तसेच पक्षीप्रेमींना ‘स्पॅरोज शेल्टर’चे कृत्रिम घरटी हवी असल्यास 9867633355 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने
केले आहे.