पालिकेच्या केईएम, शीव आणि नायर रुग्णालयातील परिचारिका प्रवर्गाच्या डय़ुटी पॅटर्नकरिता म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अंबादास दानवे यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी चर्चा करून नर्सिंग डय़ुटीचा एकतर्फी निर्णय घेऊ नका, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या.
डय़ुटी पॅटर्नसाठी प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेऊ नये व 16 जूनपूर्वीचा जो नर्सिंग डय़ुटी पॅटर्न सुरू आहे त्यात कोणताही बदल करू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या. याला डॉ. शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागणी मान्य केली. या बैठकीला संघटनेच्या उपाध्यक्षा रंजना नेवाळकर, संजय कांबळे-बापेरकर, चिटणीस हेमंत कदम, संजय वाघ, रामचंद्र लिंबारे, संघटक मंगल तावडे, सल्लागार हरीश जामठे उपस्थित होते.