पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत काँग्रेसने मागणी केली आहे की, रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेतलं जाऊ नये.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने रश्मी शुक्ल यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. यातच काँग्रेसने रश्मी शुक्ला यांना कुठल्याही सरकारी पदावर घेतलं जाऊ नये, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आपल्या याचिकेत काँग्रेसने काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. याचिकेत काँग्रेसने म्हटलं आहे की, निवडणूक आयोगाने शुक्ला यांना पदावरून काढून टाकावं, असं आपल्या आदेशात म्हटलं होतं. यानंतरही रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर का पाठवण्यात आलं?
तसेच संजयकुमार वर्मा यांची पोलीस महासंचालक पदावर नियमानुसार नेमणूक झाली आहे. असं असतानाही त्यांना तात्पुरते पद का देण्यात आलं आहे, असा प्रश्न काँग्रेसने आपल्या याचिकेतून उपस्थित केला आहे.