राजकीय हेतूसाठी देशमुख हत्याप्रकरणातील दोषींना वाचवले तर जनता शांत बसणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

prithviraj-chavan

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय हेतूसाठी देशमुख हत्याप्रकरणातील दोषींना वाचवले तर जनता शांत बसणार नाही, असा इशारा महायुती सरकारला दिला आहे.

मुख्यमंत्री, गृहमंत्री शांतपणे याकडे पाहत आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या घटनांमागे जो मंत्री असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होते, ही सरकारची जबाबदारी आहे की, त्यांनी या घटनेशी संबंधित सर्वांचे राजीनामे घेतले पाहिजेत. राज्यामध्ये गुंतवणूकदार येत आहेत. त्यांच्याकडे जर खंडणी मागितली जात असेल तर कोणीही महाराष्ट्रात येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीकडे लक्ष द्यावे, त्यांचे हे अपयश आहे. उच्चपदस्थांचे त्वरीत राजीनामे घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

मस्साजोगसारख्या घटनांना सरकारच जबाबदार आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री शांतपणे याकडे पाहत आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या घटनांमागे जो मंत्री असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सर्वांना माहिती आहे की, दोषी कोण आहेत. त्या लोकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. खंडणीच्या मागणीमुळे राज्यात गुंतवणूकदार आले नाहीत तर रोजगार निर्माण होणार नाही. खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. हे सर्व भाजपचे अपयश आहे. परळी पॅटर्न जगजाहीर आहे. बीडमध्ये काय चालले ते सर्वांना माहिती आहे. राजकीय हेतूसाठी संबंधितांना वाचवले गेले तर जनता शांत बसणार नाही,असा इशाराही पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिला.