
अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटावरून सध्याच्या घडीला चांगलाच वादंग निर्माण झालेला आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर, ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी फुले चित्रपट जातीय वाद वाढवणारा असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हा विषय अधिकच गंभीर होत गेलेला आहे. फुले चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्साॅरने देखील आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळेच आता चित्रपटातील वादावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
‘ न्यूज १८ मराठी’ सोबत बोलताना अनंत महादेवन म्हणाले, ‘ब्राह्मण समाजाला वाटतंय की, ‘फुले’ हा चित्रपट त्यांच्या विरोधात आहे. परंतु हे सर्व खोटं असून, हा सिनेमा सारासार विचार करुनच तयार करण्यात आलेला आहे. परंतु केवळ टीझर पाहून आपण एखाद्या चित्रपटाविषयी मत बनवू शकत नाही. त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर हा विरोध किती चुकीचा आहे, हे नक्कीच कळेल’.
यावर अधिक बोलताना ते म्हणाले, ‘मी स्वतः एक ब्राह्मण आहे, त्यामुळे माझ्याएवढा स्ट्राँग ब्राह्मण कुणीच नाही. त्यामुळे हा चित्रपट करुन मी कोणतीही चूक केली नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पहिल्या शाळेला ब्राह्मणांनी जागा दिली होती. त्यामुळे हा चित्रपट ब्राह्मण समाज आणि ज्योतिबा फुले यांची हेटस्टोरी नाही तर लव्हस्टोरी आहे’.
त्याकाळी सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकलं गेलं होतं. तेच आम्ही चित्रपटातही दाखवलं आहे. या चित्रपटासाठी आम्ही भरपूर खर्च केलेला असून, कृपया करुन उगाच याबद्दल वाईट प्रसिद्धी आणि गैरसमज पसरवु नका असे अनंत महादेवन /यांनी मत व्यक्त केलं आहे. चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पंधरा दिवस पुढे ढकलली असून यातून कोणताही सीन काढणार नाही अशी ठाम भूमिका महादेवन यांनी घेतली आहे. येत्या २५ तारखेला हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचा स्पेशल शो आयोजित करणार का या प्रश्नावर ते म्हणाले, मी काहीच चूक केली नाही मी कशाला स्पेशल शो आयोजित करु?