विकास करतोय याचा अहंकार नको

आपल्या पूर्वजांनी निसर्गाला, प्रकृतीला सावरण्याचे काम केले. आपण त्याचा विनाश करण्याच्या मार्गावर आहोत. विकास करत आहोत याचा आपण अहंकार बाळगायला नको, असे मत थ्री इडियट फेम आणि लडाख येथील पर्यावरणवादी सोन वांगचूक यांनी केले आहेत. तसेच त्यांनी आपल्या पूर्वजांकडून प्रकृती संरक्षणाचे धडे घेण्याचा सल्लाही दिला आहे.

रोटरी क्लबच्या वतीने आज रोटरी रिजॉइस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात व्याख्याते म्हणून सोन वांगचूक यांना पर्यावरण बदल या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पृथ्वीची स्थिती अत्यंत वाईट होत चालली आहे. सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग ऑल इज वेल म्हणायची इच्छा आहे, परंतु सध्या पृथ्वीवर ऑल इज नॉट वेलची स्थिती आहे. जलवायू परिवर्तन हा अतिशय नाजूक विषय आहे. लडाख हा प्रदेश पृथ्वीवर आहे, परंतु लडाखचे भौगोलिक वातावरण दिल्ली, नागपूरसारखे नसून मंगळ ग्रहासारखे झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारच्या लडाखबाबतच्या धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

लडाख अडथळय़ांची राजधानी

लडाख ही अडथळय़ांची राजधानी असून सध्या लडाख ज्या समस्येचा सामना करत आहे, त्यासाठी तेथील लोक जबाबदार नाहीत. पर्यावरणीय बदलांबाबत आवाज उठवला तर लोक अजेंडा काय आहे, असे विचारतात. इथे घरात आग लागली आहे आणि लोक अजेंडय़ावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, असेही ते म्हणाले.