
आषाढी यात्रा सोहळा पंढरपुरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यासाठी 20 लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी आले होते. श्री विठ्ठलाकडे सुखसमृध्दीचे साकडे घालणार्या वारकर्यांनी विठुरायाच्या व रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले आहे. तसेच सोन्या चांदीचे कोट्यावधी रुपयांचे दागिने अर्पण केले आहेत. तर मंदिर समितीला लाडू प्रसाद, परिवार देवता, सोने भेट, ऑनलाईन देणगी, भक्तनिवास आदींच्या माध्यमातून 8 कोटी 34 लाख 84 हजार 174 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जे गतवर्षीच्या आषाढी यात्रेच्या 2 कोटी रुपयांनी जास्त आहे.
गेल्यावर्षी आषाढी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 6 कोटी 27 लाख 54 हजार 227 रुपये उत्पन्न मिळाले होते. मात्र यंदा उत्पन्नात 2 कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. या भाविकांनी श्रींच्या चरणी लाखो रुपयांचे दानही दिले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या परिवार देवतांकडून जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळालेले आहे. त्याचबरोबर श्रींना सोने, चांदीची देखील भाविकांनी भेट दिलेली आहे. 6 ते 21 जुलै या दरम्यान आषाढी यात्रेत भाविकांनी दान दिले आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व कर्मचारी यांनी चांगली सुविधा दिल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे पदस्पर्शदर्शन 483523 भाविकांनी तर मुखदर्शन 605004 भाविकांनी घेतले आहे. असे एकूण 10 लाख 88 हजार 527 भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले आहे. तर लाखो भाविकांनी नामदेव पायरी व कळस दर्शन घेतलेले आहे.
-बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, मंदिर समिती
असे मिळाले उत्पन्न
श्रींच्या चरणाजवळ रू.7706694
भक्तनिवास रू.5060437
देणगी रू.38226828
लाडूप्रसाद रू.9853000
पूजा रू.399209
सोने भेट रू.1788373
चांदी भेट रू.20365228
इतर रू.364000