ओलिसांची तत्काळ सुटका करा, अन्यथा…; ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला निर्वाणीचा इशारा दिला आहे. हमासने इस्रायली ओलिसांची तत्काळ सुटका करावी. 20 जानेवारीपर्यंत ओलिसांची सुटका केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम हमासला भोगावे लागतील, असा निर्वाणीचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पत्नी सारा यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांचे हे वक्तव्य आले आहे.

साराने रविवारी फ्लोरिडा येथील ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ कोर्समध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. दोघांनी एकत्र जेवणही केले. यादरम्यान सारा यांनी ट्रम्प यांच्याशी गाझा युद्ध आणि ओलिसांच्या सुटकेबाबत चर्चा केली. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 1200 हून अधिक इस्रायली नागरिक मारले गेले. हमासने 251 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले होते. यापैकी काही ओलिसांचा मृत्यू झाला आहे.

ट्रम्प पॅरिसला जाणार

डोनाल्ड ट्रम्प हे या आठवड्याच्या शेवटी पॅरिसला भेट देणार आहेत. तेथे ते 7 डिसेंबर रोजी नोट्रे डेम कॅथेड्रल चर्चच्या उद्घाटन समारंभात भाग घेतील. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांचा हा पहिलाच विदेश दौरा असणार आहे. फ्रान्स सरकारने ट्रम्प यांना उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. ट्रम्प यांना निमंत्रण मिळताच त्यांनी लगेचच फ्रान्सला जाण्यास होकार दिला. या कार्यक्रमाला 50 राष्ट्रप्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे.