
अमेरिकेसोबत अणूकरार करा अन्यथा बॉम्बहल्ले आणि शुल्कवाढीचा सामना करा असा कठोर इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला. परंतु, या धमकीला इराणने ठेंगा दाखवला असून प्रत्युत्तरासाठी क्षेपणास्त्रे सज्ज केली आहे. विशेष म्हणजे इराणने जमिनीखालील न्युक्लियर सिटीचा व्हिडीओही जारी केला आहे.
इराणी सैन्याने देशभरात भूमिगत तळ बनवून तिथे ठेवलेली क्षेपणास्त्रे प्रक्षेपणासाठी सज्ज केली आहेत. हे भूमिगत तळ देशावरील कोणत्याही मोठय़ा हल्ल्यांना तोंड देण्यासाठी केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच इराणच्या सर्वोच्च नेत्यानेही बदला घेण्याची धमकी दिल्यामुळे मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खौमेनी यांचे प्रत्युत्तर
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खौमेनी यांनी ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर दिले आहे. अमेरिकेने बॉम्ब हल्ले केले तर तितकाच मोठा बॉम्बहल्ला करू असा इशारा खौमेनी यांनी दिला आहे. आधीपासूनच आमचे अमेरिका आणि इस्रायलशी शत्रुत्व आहे. ते केवळ धमक्या देतात. परंतु, तरीही त्यांनी असा प्रयत्न केलाच तर नक्कीच त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे खौमेनी यांनी म्हटले आहे.