करार केला नाही तर बॉम्बवर्षाव करू; अणुकरारावरून ट्रम्प यांची इराणला धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठे विधान केले आहे. जर इराणने अणुकराराला मान्यता दिली नाही तर वॉम्बवर्षाव होईल, अशी स्पष्ट धमकी त्यांनी दिली आहे. शिवाय इराणला कठोर आर्थिक निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एनबीसी न्यूजला दिलेल्या टेलिफोन मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, “अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा सुरू आहे. पण जर इराण सहमत झाला नाही तर वॉम्बवर्षाव होईल. जर इराण सहमत झाला नाही तर मी त्यांच्यावर पुन्हा सेकंडरी टॅरिफ लादेन, जसे मी चार वर्षांपूर्वी केले होते.”

दरम्यान, ईरान आणि अमेरिकेतील तणाव गेल्या काही वर्षांपासून अणुकराराला मुद्द्यावरून वाढत आहे. 2015 मध्ये झालेल्या जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन (JCPOA) या करारातून ट्रम्प यांनी 2018 मध्ये अमेरिकेला बाहेर काढले होते. त्यानंतर ईरानने आपला न्यूक्लियर कार्यक्रम पुन्हा सुरू केला, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडले. आता ट्रम्प यांनी नवीन करारासाठी ईरानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ट्रम्प यांच्या धमकीनंतर ईरानने ओमानच्या मध्यस्थीने अमेरिकेला औपचारिक लेखी उत्तर पाठवले आहे. या उत्तरात ईरानने नवीन अणुकरारासाठी चर्चेची शक्यता दर्शवली आहे. मात्र त्यांनी अमेरिकेच्या धमकीला प्रत्युत्तर देताना आपली संरक्षण तयारीही मजबूत असल्याचे म्हटले आहे.