चीनच्या निर्णयामुळे ट्रम्प चौताळले; दिली नवी धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर टॅरिफ लादल्याने जगभरात अस्वस्थता वाढली आहे. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकन उत्पादनांवर 34 टक्के टॅरिफ लादला. त्यामुळे अमेरिका आणि चीनमधील आता टॅरिफ युद्ध पेटलं आहे.चीनच्या यानिर्णयामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी चीनचा टॅरिफ 34 वरून वाढवून 50 करण्याचा इशारा दिला आहे.

ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर 34 टक्के अतिरिक्त कर लादला, ज्यामुळे या वर्षी चीनमधून आयात होणाऱ्या एकूण अमेरिकेच्या आयातीवरील कर 54 टक्क्यांवर पोहोचला. जर आता अमेरिकेने चीनवर 50 टक्के कर लावला तर चीनवरील कर हा 70 टक्क्यांवर पोहोचेल.

या घडामोडींनंतर आणि सर्वत्र टीका होत असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टॅरिफ निर्णयाचे जोरदार समर्थन केले आणि म्हटले की जागतिक व्यापारात अमेरिका अव्वल आहे. हा निर्णय अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे. जगातील अनेक देशांनी अमेरिकेची फसवणूक केली असून आमचा गैरफायदा घेतला आहे. आता अमेरिका फर्स्टसाठी आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील हा त्याचाच एक भाग आहे. आम्ही अमेरिकेत पूर्वीपेक्षा जास्त नोकऱ्या आणि व्यवसाय परत आणत आहोत. 5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक आधीच झाली आहे आणि ती वेगाने वाढत आहे. ही एक आर्थिक क्रांती आहे आणि आम्ही जिंकू. धीर धरा, हे सोपे नसेल, परंतु अंतिम निकाल ऐतिहासिक असेल. आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू. त्यामुळे आता आम्ही या निर्णयापासून मागे हटणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते.