ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका; 1700 अवैध स्थलांतरित हिंदुस्थानींना बेड्या, 11 दिवसांत 25 हजारांहून अधिक लोकांना ताब्यात घेतले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात घेतलेल्या कठोर निर्णयाचे परिणाम आता अमेरिकेत दिसत आहेत. ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर 11 दिवसांत तब्बल 25 हजारांहून अधिक अवैध स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट टीमने 12 राज्यांमध्ये छापे घातले असून रिपब्लिकन राज्यांमध्ये सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. यात 1700 अवैध स्थलांतरित हिंदुस्थानीना बेड्या ठोकण्यात आल्याचे वृत्त आहे.

याआधी 18 हजार अवैध अनिवासी हिंदुस्थानींची हद्दपारीसाठी निवड करण्यात आली होती. या काळात मेक्सिको सीमेवरून घुसखोरीच्या घटनांमध्ये 64 टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. बायडेन यांच्या कार्यकाळात 1 ते 19 जानेवारीदरम्यान रोज सरासरी 2087 घुसखोरीच्या घटना घडल्या, तर 20 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत रोज रोज सरासरी केवळ 126 घुसखोरीच्या घटना घडल्या.

कॅनडा, मेक्सिको, चीनवर लादले अतिरिक्त आयात शुल्क

ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर 25 टक्के, तर चीनवर 10 टक्के टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क लावले आहे. हे देश टॅरिफ लांबवणीवर टाकण्यासाठी काहीही करू शकतात. त्याला मी असे उत्तर दिले आहे की, ते आता काहीही करू शकणार नाहीत. दुसरीकडे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस टडो यांनीही 155 अब्ज अमेरिकन डॉलर किंमतीच्या अमेरिकेच्या आयातीवर 25 टक्के शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे.

ट्रम्प यांनी रोहित चोप्रा यांना हटवले

मूळचे हिंदुस्थानी वंशाचे आणि आर्थिक सुरक्षा विभागाचे प्रमुख  रोहित चोप्रा यांना ट्रम्प सरकारने पदावरून हटवले आहे. चोप्रा यांचा कार्यकाळ 2026 पर्यंत होता; परंतु त्याआधीच त्यांना पदावरून हटवण्यात आले. चोप्रा यांची नियुक्ती माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली होती. अमेरिकेत सुरक्षा कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी चोप्रा ओळखले जात होते. चोप्रा यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा होता. काहींकडे अधिक शक्ती आणि अधिकार आहेत. त्यामुळे सध्या सीएफपीबी म्हणजेच आर्थिक सुरक्षा विभागाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, असा टोला चोप्रा यांनी एक्सवर एक पोस्ट टाकून ट्रम्प यांना लगावला आहे.