बॅलेट पेपरच निवडणुकीसाठीचं सर्वात सुरक्षित माध्यम; EVM वरून ट्रम्प यांचं पुन्हा मोठं विधान, मोदींवर साधला अप्रत्यक्ष निशाणा

लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी निःपक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पडाव्यात यासाठी निवडणूक ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणी वारंवार विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. ईव्हीएमवर विरोधकांनी अनेकदा शंका व्यक्त केली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते म्हणताना दिसत आहेत की, ”निवडणुकीसाठी सर्वात सुरक्षित माध्यम हे बॅलेट पेपर आहे.” हा व्हिडीओ 23 फेब्रुवारीचा असून अमेरिकन राज्यांमधून निवडून आलेल्या राज्यपालांना संबोधित करताना ट्रम्प यांनी ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवर भाष्य केलं आहे. याच भाषणाच्या व्हिडीओची चर्चा आता हिंदुस्थानात होताना दिसत आहे.

या व्हिडीओत डोनाल्ड ट्रम्प बोलताना दिसत आहेत की, “इलॉन मस्क यांनी मला सांगितलं की, मशीन मतदानासाठी बनवण्यात आलेल्या नाहीत. मशीन यासाठी योग्य नाहीत. याशिवाय एमआयटीच्या एका प्राध्यापकाने असं म्हटलं आहे की, निवडणुकीसाठी बॅलेट पेपरच योग्य आहेत.” डोनाल्ड ट्रम्प यांनी एक तास आणि 13 मिनिटांचे हे भाषण असून त्यातील 44 सेकंदांची व्हिडीओ किल्प हिंदुस्थानी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या भाषणा डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, ”जर देशाच्या सुरक्षितता कल्याणाचा प्रश्न असेल तर, त्यासाठी म्हाला कितीही किंमत मोजावी लागली, जी 10 पट जास्त असली तरी, प्रत्यक्षात हा तुमच्यासाठी खर्चाचा एक छोटासा भाग आहे.” बॅलेट पेपरबद्दल बोलताना ते म्हणाले की, ”बॅलेट पेपर हे एक चांगलं माध्यम असून याला कॉपी करता येत नाही. तसेच हे फसवणूकीसाठी वापरले जाऊ शकत नाहीत.”

ट्रम्प पुढे म्हणाले की, ”मी इलॉन मस्कला याबद्दल विचारले, त्याला कॉम्प्युटरबद्दल बरेच काही माहित आहे. मी त्याला विचारले की, मतदान व्यवस्थेबद्दल त्याचे काय मत आहे. यावर ते म्हणाले की, कॉम्प्युटर मतदानासाठी बनलेले नाहीत. ते यासाठी योग्य नाहीत. याने बरेच ट्रांजेक्शन खूप वेगाने आणि लवकर होतात.”

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मी कॉम्प्युटरच्या जगातील काही नामवंत लोकांशी चर्चा केली. माझे एक काका एमआयटी (मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मध्ये 41 वर्षांपासून प्राध्यापक आहेत, ते यात सर्वोत्तम आहेत. ते तुम्हाला सांगतील की निवडणुका घेण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे बॅलेट पेपर आहे. याने फसवणूक होऊ शकत नाही.”