
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर ट्ररिफ लादल्याने जगभरातील अस्वस्थता वाढली आहे. तसेच ट्रम्प जगाला महामंदीकडे नेत आहे, अशी टीकाही होत आहे. अमेरिकेतूनही ट्रम्प यांच्या धोरणावर टीका होत आहे. मात्र, ट्रम्प यांनी शेअर बाजारातील घसरण आणि संभाव्य धोक्यांच्या सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून ही श्रीमंत होण्याची संधी असल्याचे म्हटले आहे. तसेच आम्ही आमच्या धोरणांवर आणि अमेरिका फर्स्टसाठी भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. अब अमेरिका झुकेगा नही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. अमेरिका टॅरिफल्या हत्यार बनवत आहे, याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा चीनने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात ट्ररिफ वॉर आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर 34 टक्के अतिरिक्त कर लादला, ज्यामुळे या वर्षी चीनमधून आयात होणाऱ्या एकूण अमेरिकेच्या आयातीवरील कर 54 टक्क्यांवर पोहोचला. या कारवाईला बीजिंगने तात्काळ प्रत्युत्तर देतसर्व अमेरिकन वस्तूंवर अतिरिक्त 34 टक्के कर लादण्याची घोषणा केली. या घडामोडींनंतर आणि सर्वत्र टीका होत असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टॅरिफ निर्णयाचे जोरदार समर्थन केले आणि म्हटले की जागतिक व्यापारात अमेरिका अव्वल आहे. हा निर्णय अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे. जगातील अनेक देशांनी अमेरिकेची फसवणूक केली असून आमचा गैरफायदा घेतला आहे. आता अमेरिका फर्स्टसाठी आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील हा त्याचाच एक भाग आहे. आम्ही अमेरिकेत पूर्वीपेक्षा जास्त नोकऱ्या आणि व्यवसाय परत आणत आहोत. 5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक आधीच झाली आहे आणि ती वेगाने वाढत आहे. ही एक आर्थिक क्रांती आहे आणि आम्ही जिंकू. धीर धरा, हे सोपे नसेल, परंतु अंतिम निकाल ऐतिहासिक असेल. आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू. त्यामुळे
आता आम्ही या निर्णयापासून मागे हटणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी भूमिकेवर ठाम असल्याचे जाहीर करताच चीननेही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिका जगाविरोधात टॅरिफचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. त्यामुळे जग आता मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अमेरिकेने ट्ररिफचा शस्त्र म्हणून वापर केला तर त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा चीनने दिला आहे. आम्ही आमचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकास हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलत राहील. अमेरिकेने चीनची अर्थव्यवस्था आणि व्यापार दडपण्यासाठी शस्त्र म्हणून शुल्क वापरणे थांबवावे आणि चिनी लोकांच्या कायदेशीर विकास अधिकारांना कमी लेखणे थांबवावे असे आवाहन चीनने केले आहे. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील या टॅरिफ वॉरमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरील संकंटाचे सावट अधिक गडद झाले आहे.