युद्धविराम करार आणि हमासकडून इस्रायली ओलिसांना सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर इस्रायली सैन्याच्या जवानांनी गाझापट्टीतून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. त्यादरम्यान आता अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी गाझापट्टीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझापट्टी (Gaza) विकत घेण्याचा विचार पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे. तसेच गाझापट्टीचा काही भाग विकसीत करण्यासाठी मध्य पूर्व देशांना देखील देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एअरफोर्सच्या एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सांगितले आहे. ”गाझापट्टी विकत घेण्याचा आमचा विचार असून हमास तिथे पुन्हा कधीच परतणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू. गाझापट्टी हा एक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला पट्टा आहे. आम्हाला कोणतीही घाई नाही. आम्ही तो हळू हळू विकसीत करू. मध्य पूर्वेच्या या प्रदेशात आम्हाला स्थैर्य आणायचे आहे, असे ट्रम्प यांनी या कार्यक्रमात सांगितले.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू यांची भेट झाली होती. त्या भेटीतही ट्रम्प यांनी गाझापट्टीबाबत नेत्यानाहू यांच्याशी चर्चा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. ”डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे गाझापट्टीसाठी एक वेगळे व्हिजन आहे”, असे नेत्यानाहू म्हणाले.