टॅरिफ ही तर श्रीमंत होण्याची संधी, बदलांच्या काळात आर्थिक दुर्बल संपतील; शेअर बाजारातील घसरणीबाबत ट्रम्प यांचे धक्कादायक विधान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जगात टॅरिफ वॉरची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच यामुळे जगभरावर मंदीचे सावटही आहे. या धोरणामुळे गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेच्या शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. 2020 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात झालेल्या घसरणीकडे ट्रम्प यांनी दुर्लक्ष केले आहे. टॅरिफ हे संकट नसून श्रीमंत होण्याची ही चांगली संधी आहे. या बदलांच्या काळात फक्त दुर्बल संपतील, असे धक्कादायक विधानही त्यांनी केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉरमुळे त्यांच्या देशातील शेअर बाजारातील घसरणीकडे दुर्लक्ष केले आहे. टॅरिफ धोरणाबाबत त्यांनी आपल्या भूमिकेवर टाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या धोरणांमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे. टॅरिफमुळे मोठे व्यवसायिक चिंतित नाहीत कारण त्यांना माहित आहे की हे संकट नसून श्रीमंत होण्याची चांगली संधी आहे. जे सक्षम आहेत तेच या बदलाच्या काळात टिकून राहतील, आर्थिक दुर्बल मात्र संपणार आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले.

कोरोना महामारीनंतर वॉल स्ट्रीट मोठ्या घसरणीतून जात आहे. स्टँडर्ड अँड पूअर्स 500 (S&P 500) मध्ये 6% घट झाली आहे, ज्यामुळे केवळ दोन दिवसांत बाजार मूल्यात 5 ट्रिलियन डॉलर्सची घट झाली आहे. तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज (DJIA) 5.5% आणि नॅस्डॅक 5.8% घसरला, ज्यामुळे शेअर बाजार मंदीच्या सावटाखाली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीनने मॅचिंग टॅरिफ लादले तेव्हा अमेरिकन शेअर बाजारात ही विक्री सुरू झाली. चीन आता 10 एप्रिलपासून सर्व अमेरिकन आयातीवर 34% दराने आयात कर आकारणार आहे. त्यामुळे जगात टॅरिफ वॉर सुरू होण्याची शक्यता आहे.

श्रीमंत होण्याची ही एक उत्तम वेळ आहे. आर्थिक संकट हे तात्पुरते आहे. व्यापार असमतोल दुरुस्त करण्यासाठी आवश्यक प्रक्रियेतून आपण जात आहोत. या धोरणाची तुलना त्यांनी शस्त्रक्रियेशी केली आहे. तात्पुरत्या वेदना सहन केल्यास आपल्याला दीर्घकालीन फायदे मिळतील. या बदलाच्या काळात फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकच अपयशी ठरतील, असेही त्यांनी म्हटले आहे.