
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले आहे. आणि हिंदुस्थानात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 182 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचा सलग तिसऱ्या दिवशी पुनरुच्चार केला आहे. ट्रम्प यांनी आपल्या ताज्या भाषणात हिंदुस्थान आणि बांगलादेशला स्वतंत्र आर्थिक मदत दिल्याचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने शुक्रवारी एक वृत्त दिले होते. या वृत्तात 182 कोटी रुपयांची आर्थिक मदत ही हिंदुस्थानला नाही तर, बांगलादेशला दिल्याचा दावा केला होता. या वृत्ताच्या अगदी उलट विधान ट्रम्प यांनी केले आहे.
हिंदुस्थानला 2008 पासून निवडणुकीशी संबंधित कोणत्याही योजनेसाठी अमेरिकेकडून कोणताही निधी मिळालेला नाही. मात्र, 2022 मध्ये बांगलादेशातील एका प्रकल्पासाठी मतदान वाढवण्यासाठी 182 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली होती, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने शुक्रवारी दिले होते. याचा उलट वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
“माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुस्थानला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 182 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. हिंदुस्थानातील मतदानासाठी आम्ही 182 कोटी रुपयांची आर्थिक मदत देत आहोत. मग आपले काय? आपल्यालाही मतदान वाढवायचे आहे”, अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली आहे. बांगलादेशातील एका फर्मला 29 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देत आहोत. या फर्मबद्दल कोणालाच माहिती नाही. त्या फर्ममध्ये फक्त दोनजण काम करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प गेल्या तीन दिवसांपासून हिंदुस्थानला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीवर बोलत आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन हिंदुस्थानात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 182 कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार होते. परंतु या मदतीच्या आडून बायडेन हिंदुस्थानात नेमके कुणाला जिंकवण्याचा प्रयत्न करत होते, असा सवाल ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. तसेच या प्रकरणी मोदी सरकारशी चर्चा करणार असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.