
नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना केवळ 430 रुपयांचा भत्ता मिळाल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आश्चर्याचा धक्का बसला. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ट्रम्प यांना विल्यम्स आणि विल्मोर यांना मिळणाऱ्या भत्त्याबाबत प्रश्न केला असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले. जर भत्ता द्यायचा झाल्यास मी माझ्या खिशातून देण्यास तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प पुढे म्हणाले की, फक्त एवढेच? त्या दोघांनी ज्या परिस्थितीचा सामना केला, त्या तुलनेत हे काहीच नाही. दरम्यान, केवळ दहा दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या विल्यम्स आणि विल्मोर यांना तांत्रिक अडचणींमुळे तब्बल 278 दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडकून पडावे लागले. नासाच्या धोरणानुसार नासाचे अंतराळवीर हे अमेरिकेचे फेडरल कर्मचारी असतात आणि त्यांचे निश्चित वेतन ठरलेले असते. त्यामुळे अंतराळात अधिकचा काळ घालवावा लागल्याबद्दल वेगळे वेतन मिळणार नाही.
अंतराळवीरांचा प्रवास, खाणे-पिणे आणि राहण्याची व्यवस्था नासाकडून केली जाते. अतिरिक्त वेळ काम केल्याबद्दल विल्यम्स आणि विल्मोर यांना दैनंदिन भत्ता 5 डॉलर्स अर्थात 430 रुपये मिळणार आहे. याप्रमाणे या दोघांना 286 दिवसांसाठी त्यांना केवळ 1,430 डॉलर्स म्हणजेच 1 लाख 22 हजार 980 रुपये दिले जातील.