रशिया-युक्रेन युद्ध संपणार, डोनाल्ड ट्रम्प यांची पुतिन-झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनेचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या संदर्भात ट्रम्प यांनी स्वत: माहिती दिली आहे.

पुतिन यांच्याशी फोनवरून दीर्घ आणि सकारात्मक संवाद झाला. युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्याबाबत चर्चा सुरू करण्यावर त्यांनी सहमती दर्शवली आहे, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. गेल्या तीन वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान दोन्ही देशातील शेकडो नागरिकांचा आणि जवानांचा मृत्यू झाला आहे.

ओलिसांना शनिवारपर्यंत सोडा, अन्यथा गाझात विध्वंस; डोनाल्ड ट्रम्प यांची हमासला धमकी

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन या दोन नेत्यांमध्ये जवळपास दीड तास फोनवरून चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र काम करण्यावर सहमती दर्शवली. या चर्चेसंदर्भात ट्रम्प यांनीही माहिती दिली.

आमच्यामध्ये दीर्घ आणि सकारात्मक चर्चा झाली. युक्रेनसोबत सुरू असलेले युद्ध, मध्य-पूर्व देशांमधील परिस्थिती, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स आणि इतर विषयांवरही चर्चा झाली. आम्हाला हजारो लोकांचा जीव घेणारे युद्ध थांबवायचे असून एकत्र काम करण्याबाबत चर्चा झाली. एवढेच नाही तर दोन्ही नेते एकमेकांच्या देशांचा दौराही करतील, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी 24 तासात युद्ध संपवणार असे आश्वासन दिले होते. त्याच दृष्टीने त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्याशीही फोनवरून संवाद साधला. याबाबत झेलेन्स्की यांनी माहिती देताना सांगितले की, दोन्ही देश रशियाचे आक्रमण थोपवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलत आहेत. ट्रम्प हे रशिया-युक्रेन यांना एकत्र आणण्यात यशस्वी झाले, तर युद्ध रोखण्यासाठी जमिनीचे आदान-प्रदान करणे शक्य होईल.