आपल्या देशात येणारे सक्षम लोकं आवडतात; डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाबाबत स्पष्ट केली भूमिका

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेतली आहे. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांचे अमेरिकन आणि परदेशातून अमेरिकेत नोकरीसाठी आलेल्यांबाबत काय धोरण असणार, याची चर्चा होत आहे. इतर देशातून अमेरिकेत आलेल्यांमुळे मूळ अमेरिकन नागरिकांच्या नोकरीच्या संधी कमी होत असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प काय निर्णय घेणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. आता ट्रम्प यांनीच याबाबत आणि H1B व्हिसाबाबत आपले भूमिका स्पष्ट केली आहे.

आपल्या देशात येणारे सक्षम लोक आवडतात. हे फक्त अभियंत्यांबद्दलच नाही, तर सर्व स्तरातील लोकांबद्दल बोलत असल्याचे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यूएस सरकारच्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये 3,86,000 लोकांना H-1B व्हिसा मंजूर करण्यात आला, त्यापैकी सुमारे तीन चतुर्थांश भारतीय नागरिक आहेत. त्यामुळे याबाबतच्या त्यांच्या निर्णयाचा परिणाम सर्व स्तरांवर होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आवडतो, परंतु मला आपल्या देशात येणारे खूप सक्षम लोकही आवडतात. त्यांच्याकडे आवश्यक पात्रता नसेल, त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असेल तरीही सक्षम लोक आपल्या देशात आले पाहिजेत. एच-1बी व्हिसा प्रणालीबाबत ट्रम्पच्या समर्थकांमध्ये एक लक्षणीय मतभेद आहे. टेस्लाचे एलॉन मस्क पात्र तंत्रज्ञान व्यावसायिकांना भरती करण्यासाठी एच-1बी व्हिसा कार्यक्रमाचे समर्थन करतात. मात्र इतरांचा असा दावा आहे की यामुळे अमेरिकन कामगारांसाठी नोकरीच्या संधी कमी होतात. त्यामुळे ट्रम्प सावध प्रतिक्रिया देत दोन्ही बाजूंचा युक्तीवाद योग्य आहे, आपल्याला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आणि चर्चा आवडतात, असे त्यांंनी म्हटले आहे.

व्यवसाय विस्ताराला चालना देताना इमिग्रेशनमध्ये गुणवत्ता राखण्याचे महत्त्व ट्रम्प यांनी अधोरेखित केले. H-1B कार्यक्रम देशात अपवादात्मक प्रतिभा आणण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग म्हणून काम करतो हे कायम ठेवताना त्यांनी दोन्ही दृष्टिकोन समजून घेण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.