
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ धोरणाने चर्चेत आहेत. आता त्यांनी एक नवी घोषणा केली आहे. त्यामुळे त्या घोषणेवरून वादाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील गुन्हेगारांना हद्दपार करत त्यांना तुरुंगात डांबण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेतील गुन्हेगारांना हद्दपार करणे म्हणजे त्यांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघटन ठरेल, असा आक्षेप या निर्णयावर घेण्यात येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील गुन्हेगारांना हद्दपार करून तुरुंगात डांबणार आहेत, असे साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले यांनी सांगितले. ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली. साल्वाडोरच्या कुप्रसिद्ध CECOT मेगा-तुरुंगात अमेरिकेतील गुन्हेगारांना पाठवण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची योजना असल्याचे ते म्हणाले. ट्रम्प अमेरिकन नागरिकांना एल साल्वाडोरमधील तुरुंगात टाकून त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव शोधत आहेत. त्यामुळे या निर्णयाचा कायदेशीरपणा आणि संवैधानिक परिणामांवर तीव्र वादविवाद सुरू झाला आहे.
नायब बुकेले यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त तुरुंग जागेची आवश्यकता असल्याचे सांगत एल साल्वाडोरच्या कुप्रसिद्ध CECOT मेगा-तुरुंगात अमेरिकेतील गुन्हेगारांना पाठवण्याच्या योजनेबाबत त्यांचे मत जाणून घेतले. आपल्याला नेहमीच कायदे पाळावे लागतात, परंतु आपल्याकडे असे स्थानिक गुन्हेगार देखील आहेत जे लोकांना संकटात टाकत आहेत. ते समाजातील राक्षस आहेत, त्यामुळे त्यांना हद्दपार करणे हाच एक मार्ग असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले.
ट्रम्प यांची ही योजना अमेरिकेतील हिंसक गुन्हेगारांबाबत आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की ट्रम्प यांच्या घोषणेला कायदेशीर आधार मिळाल्यास जे सर्वात हिंसक, भयानक, वारंवार गुन्हेगार आहेत, जो समाजात राहण्यास योग्य नाहीत. त्यांना हद्दपार करण्याची योजना आहे. मात्र, कायदा तज्ज्ञांनी याला आक्षेप घेतला आहे. अमेरिकन गुन्हेगार हे देशाचे नागरिक आहेत, त्यांना हद्दपार करणे असंवैधानिक असेल आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल. वॉशिंग्टन डीसी येथील थिंक टँक असलेल्या कॅटो इन्स्टिट्यूटचे डेव्हिड बियर यांनी असा दावा केला आहे की अशा कृती “स्पष्टपणे असंवैधानिक, स्पष्टपणे बेकायदेशीर” आहे.
एल साल्वाडोरचे अध्यक्ष बुकेले यांनी त्यांच्या देशातील तुरुंगात अमेरिकन गुन्हेगारांना सामावून घेण्याची तयारी दर्शविली आहे. ते म्हणाले, आमच्याकडे जागा आहे. ट्रम्प प्रशासनाने आधीच 200 हून अधिक कथित टोळीतील गुंडांना एल साल्वाडोरला हद्दपार केले आहे. अमेरिकन तुरुंग कारभार एल साल्वाडोरला आउटसोर्स करण्याची कल्पना नवीन नाही. फेब्रुवारीमध्ये, बुकेले यांनी सोशल मीडियावर त्यांच्या देशाच्या ऑफरबद्दल पोस्ट केले होते की त्यांनी शुल्काच्या बदल्यात दोषी ठरलेल्या अमेरिकन नागरिकांना, ज्यात हिंसक गुन्हे आहेत, त्यांना ताब्यात घेण्याची ऑफर दिली होती. ट्रम्प यांचे सहकारी एलोन मस्क यांनी बुकेले यांच्या पोस्टची दखल घेतली आणि एक उत्तम कल्पना!! असे त्याचे वर्णन केले. ट्रम्प यांनी या प्रस्तावावर विचार करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यांच्या या योजनेबाबत वादविवादाला सुरुवात झाली आहे.