
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गोल्फ खेळाची खूप आवड आहे, पण त्यांच्या या आवडीमुळे अमेरिकन करदात्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. एका अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळातील 48 पैकी 13 दिवस गोल्फ खेळण्यात घालवले आणि यावर लाखो डॉलर्स खर्च झाले आहेत. त्यांच्या अलीकडच्या गोल्फ विकेंडवर 18 दशलक्ष डॉलर म्हणजे साधारण 157 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. यापुढेही हा खर्च वाढण्याचा अंदाज आहे.
राष्ट्राध्यक्षांचा हा महागडा छंद म्हणजे सरकारी पैशांची उधळपट्टी आहे, असे टीकाकारांचे म्हणणे आहे, तर समर्थक याला वैयक्तिक पसंती म्हणतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 16 पेक्षा जास्त गोल्फ कोर्स आहेत. त्यापैकी बहुतेक युनायटेड स्टेट्स, स्कॉटलंड, आयर्लंड येथे आहेत. फ्लोरिडा आणि मियामी येथील गोल्फ कोर्ससाठी ते विमानाने जातात. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात गोल्फच्या सवयीवर 141 मिलियन डॉलर इतका खर्च झाला होता. ट्रम्प यांनी 4 लाख डॉलरचे राष्ट्रपती वेतन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यापेक्षा हा खर्च कितीतरी जास्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवडीवर विरोधक टीका करत आहेत.