अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला; निवडणूक प्रचारादरम्यान अंदाधुंद गोळीबार

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्लाझाला आहे. पेन्सिल्वेनियाच्या बटलर येथे निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात ट्रम्प जखमी झाले आहेत. ट्रम्प यांच्या उजव्या कानाला दुखापत झाली असून त्यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो व्हायरल होत आहे. यामुळे अमेरिकेसह जगभरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. यात ते एका सभेला संबोधित करताना दिसत असून अचानक गोळीबाराचा धाडधाड असा आवाज येतो. ट्रम्प यांचे सुरक्षारक्षक मूव्ह…मूव्ह… असे ओरडतात. गोळीबारानंतर ट्रम्प उजव्या कानाला हात लावून मंचावर खाली बसतात आणि सुरक्षारक्षक त्यांना घेरतात. त्यानंतर त्यांना मंचावरून खाली नेण्यात येते.

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर सभेला उपस्थित लोकांमध्येही गोंधळ उडतो आणि सर्व लोक आपापल्या जागेवर जमिनीवर झोपतात. गोळीबारानंतर सुरक्षा रक्षकही अलर्ट होतात आणि ट्रम्प यांना घेराव घालतात. यानंतर ट्रम्प मंचावरून खाली उतरतात. खाली उतरताना त्यांच्या उजव्या कानाला दुखापत झाल्याचे आणि चेहरा रक्तबंबाळ झाल्याचे दिसते. यानंतर ट्रम्प मुठ आवळून काहीतरी बोलतात.

सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पेन्सिल्वेनियामध्ये एका सभेला संबोधित करत होते. याचवेळी सभास्थळाजवळील एका उंचावरील भागातून मंचाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार होतो. गोळीबार करणाऱ्याचा खात्मा करण्यात आला असून यादरम्यान सभेला उपस्थित एका व्यक्तीचाही मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे.

ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हीस एजंटची आणि सुरक्षा संस्थांचे त्यांनी आभार मानले. तसेच या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयाप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही केली. यासह अमेरिकेमध्ये असे कृत्य होऊ शकते यावर आपला विश्वास बसत नसून माझ्या उजव्या कानाला गोळी लागल्याचे त्यांनी सांगितले.आता ईश्वरच अमेरिकेचे रक्षण करू शकतो, असेही ते म्हणाले.

Image