ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात एलन मस्कने केली ती खूण; व्हिडीओ व्हायरल, प्रचंड ट्रोल

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि हिंदुस्थानी वेळेनुसार सोमवारी रात्री 10.30 वाजता शपथविधी सोहळा पार पडला.  यावेळी भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील अनेक नेते, उद्योगपती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. या सोहळ्यात कायम ट्रम्प यांच्यासोबत असलेले एलन मस्क चर्चेत आले आहेत.  शपथविधीवेळी सोहळ्यात लोकांना संबोधित करताना मस्क यांनी असे काही केले की सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.

एलन मस्क यांचा या समारंभातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एलन मस्क लोकांना संबोधित करताना दिसत आहेत. बोलताना ते हातवारे करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या अशा प्रकारच्या हातवाऱ्यांना नाझी सॅल्यूटशी तुलना केली जात आहे. मस्क यांची तुलना जर्मनच्या अॅडॉफ हिटलरशी केली जात आहे. भाषणादरम्यान किंवा लोकांना भेटताना हिटलर हाताचे हावभाव असेच असायचे.

अमेरिकेच्या निवडणुकीत एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना खुला पाठिंबा दिला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर मस्क अनेकदा ट्रम्प यांच्यासोबत कार्यक्रमांमध्ये दिसले. त्यांनी भाषणही दिले. सोमवारीही ते वॉशिंग्टन डी.सी. कॅपिटल वन अरेना येथील व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी लोकांना संबोधित करताना त्यांनी काही हातवारे केले आणि ट्रम्स यांच्यासाठी जमलेल्या गर्दीला हाताने इशारा करत येस असे म्हणाले. त्यावेळी मस्क म्हणाले की, हा काही साधारण विजय नव्हता. हा विजय सत्यात उतरविण्यासाठी तुमचे आभार, यावेळी त्यांनी आपला डावा हात छातीवर घेत थोपटला. एलन मस्कचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, सोशल मीडिया यूजर्स त्याच्या स्टाइलची तुलना नाझी सॅल्यूटशी करत आहेत.