अमेरिका फर्स्ट अशी घोषणा देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारने कठोर कायद्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला नाही तोच याचा फटका हिंदुस्थानी दाम्पत्याला बसला आहे. परदेशातून अमेरिकेतून येणाऱ्या उपऱ्यांना आळा घालण्यासाठी ट्रम्प सरकारने कठोर कायदे करायला सुरुवात केली आहे.
न्यू जर्सीच्या नेवार्क विमानतळावर याचा प्रत्यय आला आहे. बी1 आणि बी2 व्हिजिटर व्हिसावर आपल्या मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या हिंदुस्थानी जोडप्याने परतीचे तिकीट न दाखवल्याने अमेरिकन सरकारने या दाम्पत्याला विमानतळावरच रोखले. अमेरिकेत प्रवेश करू दिला नाही. या जोडप्याकडे हिंदुस्थानात परत कधी परतणार याचे तिकीट नव्हते. त्यामुळे अमेरिकन प्रशासनाने या जोडप्याला विमानतळावरूनच माघारी धाडले. अमेरिकेत 2025 च्या इमिग्रेशन नियमांत झालेल्या बदलाचा हवाला देत विमान प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या जोडप्याला अमेरिकेत प्रवेश करू दिला नाही. अमेरिकेत व्हिजिटर व्हिसावर येणाऱ्यांकडे त्यांचे रिटर्न तिकीट दाखवणे बंधनकारक आहे.
प्रवाशांमध्ये चिंता
अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. अमेरिकेच्या नव्या कायद्यामुळे अमेरिकेत येणाऱ्यांची चिंता वाढली आहे. रिटर्न तिकीट नसेल तर अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही याची माहिती आम्हाला नव्हती. त्यामुळे आम्ही रिटर्न तिकीट काढले नाही, असे या जोडप्याचे म्हणणे आहे. इतर देशांतून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे, तर नव्या इमिग्रेशन नियमांसाठी सरकारी वेबसाईट आणि ट्रव्हल एजन्सीकडून प्रवाशांनी माहिती घ्यावी, असे अमेरिकन प्रशासनाने म्हटले आहे.