तुम्हाला निराश करणार नाही, अमेरिकेला गतवैभव मिळवून देणार – डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. यानंतर फ्लोरिडामध्ये बोलताना ट्रम्प यांच्यासह एलन मस्क यांनी आपल्या संपूर्ण टीमचे आणि पत्नी, मुलांचेही आभार मानले. यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकेला गतवैभव मिळवून देणार, असे आश्वासनही अमेरिकन नागरिकांना दिले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले. अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच असा राजकीय बदल झाला असून देशाला गरज असतानाच हा विजय मिळाला. मला 47 वा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडल्याबद्दल अमेरिकन नागरिकांचे आभार. मी तुम्हाला निराश करणार नाही. माझा प्रत्येक श्वास अमेरिकन नागरिकांसाठी असेल आणि मी त्यांच्यासाठी लढत राहील, असेही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांना 277 इलेक्टोरल मतं मिळाले आहेत. नॉर्थ कॅरोलिना, जॉर्जिया आणि पेन्सिल्वेनिया सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये आम्हाला आघाडी मिळाली आहे. आम्ही 315 इलेक्टोरल मतांनी जिंकू, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.

यावेळी ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यावरही हल्ला चढवला. कायदेशीर मार्गाने येणाऱ्यांचे स्वागत आहे. मात्र घुसखोरी रोखण्यासाठी सीमारेषांवर बंदोबस्त वाढवावा लागेल. अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसखोरी बंद व्हायला हवी, असेही ते म्हणाले.

युद्ध रोखण्यासाठीही आपण प्रतिबद्ध असल्याचे ट्रम्प म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळाचाही उल्लेख केला. आम्ही इसीसला पराभूत केले. युद्ध भडकू दिले नाही, असे म्हणत ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याची ताकद आणखी वाढवण्यावर नव्या सरकारचा भर असणार असल्याचेही म्हटले.