आम्हाला राजेशाही नको! अमेरिकेत नागरिकांचा पुन्हा उद्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांची हिटलरशी तुलना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर निर्णयांविरोधात पुन्हा एकदा अमेरिकेत उद्रेक झाला आहे. हजारो नागरिक हातात बॅनर घेऊन, घोषणा देत रस्त्यावर उतरले आहे. अमेरिकेतील सर्व 50 राज्यातील जनता टेरिफ वॉर आणि सरकारी नोकरीतील कपातीच्या निर्णयाविरोधात ‘आम्हाला राजेशाही नको’, असे म्हणत आंदोलन करत आहे. या दरम्यान आंदोलकांनी राष्ट्रपती निवास अर्थात व्हाईट हाऊसलाही घेराव घातला आहे. या आंदोलनाला 50501 नाव देण्यात आले असून याचा अर्थ ’50 निदर्शनं, 50 राज्य आणि 1 आंदोलन’, असा आहे.

राजधानी वॉशिंग्टन डीसीसह अमेरिकेतील प्रत्येक राज्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलन मस्क यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी व्हाईट हाऊससह टेस्लाच्या शोरुमलाही घेराव घातला आहे. ट्रम्प सरकार विरोधात महिन्याभरात दुसऱ्यांदा अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली आहे. याआधी 5 एप्रिल रोजी ट्रम्प सरकार विरोधात संपूर्ण अमेरिकेत मोठे आंदोलन झाले होते.

अमेरिकेचा कुणीही राजा नाही. अत्याचाराला प्रतिकार करा. हिटलरशाही चालणार नाही. हुकुमशाही चालणार नाही, अशा घोषणा लिहिलेले पोस्टर हातात घेऊन आंदोलन सुरू आहे. सरकारच्या इमिग्रेशन धोरणावरही आंदोलनकर्त्यांनी टीका केली. नो आयसीई, नो फियर, स्थलांतरितांचे येथे स्वागत आहे, असे पोस्टरही आंदोलनकर्त्यांनी यावेळी झळकावले.

आम्ही मोठ्या संकटात असून आई-वडिलांनी हिटलरच्या उदयाबाबत ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मिळत्या-जुळत्या आहेत. दोघांमध्ये एवढाच फरक आहे की हिटलर किंवा अन्य फॅसिस्ट नेत्यांहून अधिक मूर्ख ट्रम्प आहेत. त्यांनी देशात फूट पाडली आहे, असा आरोप आंदोलकर्त्यांनी केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली होती. त्यानंतर त्यांनी निर्णयांचा धडाका लावला. आधी त्यांनी लाखो सरकारी लोकांची नोकरीवरून गच्छंती केली. खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले होते. त्यानंतर त्यांनी टॅरिफ वॉर सुरू केला. याचा जगभरातील व्यवसायिकांसह अमेरिकेतील दुकानदार, छोटे उद्योजक यांनाही फटका बसला. यामुळे अमेरिकन लोक त्रस्त झाले असून सरकार विरोधात आंदोलन करत आहेत.