मस्क हे देशभक्त, त्यांनी भयानक स्थितीचा सामना केला – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी एलॉन मस्क यांचे कौतुक करताना मस्क हे देशभक्त असल्याचे उद्‌गार काढले. मस्क हे चांगले मित्र असून मी त्यांचे विशेष आभार मानू इच्छितो. मला माहीत आहे की, त्यांनी फार भयानक परिस्थितीचा सामना केला आहे. ते एक देशभक्त आहेत, असे ट्रम्प यांनी त्यांच्या नवीन सरकारच्या दुसऱ्या कॅबिनेट बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.

मस्क माझे चांगले मित्र असून त्यांनी मला निवडणुकीत पाठिंबा दिला. तेव्हाच मी खऱ्या अर्थाने त्यांना ओळखू शकलो. माझ्या पहिल्या टर्मपासून मी त्यांना ओळखत होतो, पण जास्त नाही. त्यांनी कधीही माझ्याकडे काहीही मागितले नाही. ते स्वतः करू शकतात, अशा शब्दांत ट्रम्प यांनी मस्क यांना दाद दिली.

टेस्ला कारवर हल्ला करणारे दहशतवादी

एलॉन मस्क यांच्या टेस्ला कारवर सुरू असलेली निदर्शने आणि हल्ल्यांबद्दल ट्रम्प यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, जर मस्क यांनी मला पाठिंबा दिला नसता आणि त्यांच्याकडे ‘डॉज’चे नेतृत्व नसते तर जे आज होत आहे ते घडलेच नसते. टेस्ला गाड्यांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पोलीस शोधून काढतील. या निदर्शकांना पाठिंबा देणारे लोक ओळखीचे असू शकतात. ते संकटात आहेत.