
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱयादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्दय़ांवर चर्चा झाली याबाबत हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पूर्णसत्य सांगितले नव्हते. मात्र आता ट्रम्प यांनीच आयात शुल्कात हिंदुस्थानलाही सूट नसून याबाबत मोदींना स्पष्टच सांगितल्याचे उघड केले आहे. आयात शुल्काबाबत माझ्याशी कुणीही वाद घालू शकत नाही, असेही त्यांनी दरडावले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत सांगितले. या वेळी ट्रम्प यांच्यासोबत टेस्लाचे प्रमुख एलन मस्कदेखील उपस्थित होते. 13 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये विविध मुद्दय़ांवर द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीच्या काही तासांनंतरच ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टेरीफ म्हणजेच जे देश आयात शुल्क लादतील त्यांना अतिरिक्त शुल्क लावून जसाश तसे उत्तर दिले जाईल, अशी घोषणा केली.
हिंदुस्थानचे आयात शुल्क जगात सर्वाधिक
जर मी म्हणालो असतो 25 टक्के आयात शुल्क लादणार तर ते म्हणाले असते, हे खूपच भयंकर आहे. पण मी आता म्हणतो, तुम्ही जितके आयात शुल्क लादणार तितकेच आम्ही लादणार. हिंदुस्थान लादत असलेले आयात शुल्क जगभरातील कुठल्याही देशाच्या तुलनेत खूपच जास्त आहे आणि तुम्हाला माहीत आहे का आम्ही आयात शुल्क आकारले तर ते थांबतील, असेही ट्रम्प म्हणाले. तसेच याबाबत मी हिंदुस्थानला दोष देणार नाही. परंतु व्यापार करण्याचा तो वेगळा मार्ग आहे. हिंदुस्थानला कुठलीही गोष्ट विकणे खूपच कठीण आहे. कारण त्यात अनेक अडथळे आहेत. मजबूत आयात शुल्काची मोठी समस्या आहे, याकडेही ट्रम्प यांनी लक्ष वेधले. दरम्यान, मे 2019मध्ये ट्रम्प यांनी हिंदुस्थानला टेरीफ किंग असे संबोधले होते.
मोदी म्हणाले आवडणार नाही, मी म्हणालो आकारणारच
आयात शुल्कावर मोदींशी काय चर्चा झाली याबाबत ट्रम्प यांनी मुलाखतीत सांगितले. तुम्ही जितके आयात शुल्क घेणार तितकेच आयात शुल्क मीदेखील घेणार. मोदी म्हणाले, मला हे आवडणार नाही. त्यावर मी म्हणालो, नाही. मी आयात शुल्क घेणारच. मी सर्वच देशांसोबत असे करणार नाही. त्यांच्यावरही आयात शुल्क लादणार नाही, असे उत्तर मोदींना दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
ऑटोमोबाईलवर 100 टक्के
हिंदुस्थान ऑटोमोबाईलवर 100 टक्के आयात शुल्क घेतो. हे आमच्यासाठी आणि इतर देशांसाठीही खूपच आहे, असे एलन मस्क म्हणाले. हाच धागा पकडून हे आयात शुल्क खूपच आहे असे सांगतानाच हिंदुस्थान जितके आयात शुल्क घेणार तितकेच आम्हीही घेणार, असे ट्रम्प यांनी नमूद केले. ट्रम्प यांनी मोदी यांना हिंदुस्थानवर कुठल्याही परिस्थितीत आयात शुल्क आकारले जाईल, असे निक्षून सांगितले.