हिंदुस्थान आयात शुल्क कमी करणार, ट्रम्प यांचा दावा; आजपासून जगभरात परस्पर शुल्क होणार लागू

अमेरिकेचे रेसिप्रोकल टेरीफ म्हणजेच परस्पर शुल्क जगभरात लागू होण्यासाठी 48 तास शिल्लक असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला. हिंदुस्थानने अमेरिकेच्या उत्पादनांवरील आयात शुल्क लक्षणीयरित्या कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे हिंदुस्थान या प्रकरणी आपली नेमकी काय भूमिका जाहीर करतो याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हिंदुस्थान अमेरिकेतील कृषी उत्पादनांवर 100 टक्के आयात शुल्क आकारतो. त्यामुळे अमेरिकेची उत्पादने हिंदुस्थानात विकणे अशक्य झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अनेक देशदेखील अशाच प्रकारे आयात शुल्क आकारतात. ते त्यांचे आयात शुल्क कमी करतील. कारण ते अमेरिकेसोबत चुकीचे वागले, आता युरोपियन महासंघच पहा, त्यांनी आधीच त्यांचे आयात शुल्क 2.5 टक्क्यांपर्यंत घटवण्याचा निर्णय घेतला, याकडेही ट्रम्प यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, 2 एप्रिल हा दिवस अमेरिकेसाठी मुक्ती दिन असेल अशी घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक प्रसंगी हिंदुस्थानला टेरीफ किंग म्हटले आहे. प्रचंड आयात शुल्क लादणाऱया देशांपैकी हिंदुस्थान एक आहे, असेही त्यांनी म्हटले होते.