
आपल्याला मित्र मैत्रीणींसोबत मस्करी करण्याची अनेकदा सवय असते. पण ही मस्करी त्यांच्या जीवावर बेतणार नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे. अशीच मस्करी करणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. मित्रासोबत मस्करी करताना एक महिलेचा तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही घटना डोंबिवली येथे घडली असून नगीनादेवी मंजिराम असे त्या महिलेचे नाव आहे. डोंबिवली पूर्व येथील कल्याण शीळ रोडवर विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत असून त्या इमारतीच्या एका कार्यालयात महिला सफाईचे काम करायची. मंगळवारी दुपारी ती महिला आपले काम आटोपल्यावर आपल्या सहकाऱ्यांसोबत तिसऱ्या मजल्यावरील इमारतीच्या कठड्यावर गप्पा मारत होती. बोलता बोलता सहकाऱ्याचा हात लागला आणि दोघांचाही तोल गेली. त्यात महिला खाली कोसळली तर त्या सहकाऱ्याने स्वत:चा तोल सावरला. मात्र महिला तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून त्याबाबत अधिक तपास सुरु आहे. पण या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी आहे.