कपडे, वाहनांवरील ठिपके धुऊनही जाईनात; काळ्या डागांचे करायचे काय? डोंबिवली एमआयडीसीतील प्रदुषणाने चिंता वाढली

हिरवा पाऊस, निळा नाला, गुलाबी रस्त्यानंतर डोंबिवली एमआयडीसी परिसरात सोमवारी हवेतून वाहने, शेड, झाडे, नागरिकांच्या अंगाखांद्यावर केमिकलचे काळे ठिपके पडत होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत या ठिपक्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. असे असले तरी कपडे, वाहनांवरील काळे डाग धुऊनही जात नसल्याने काळ्या डागांचे करायचे काय, या चिंतेने नागरिक धास्तावले आहेत. रासायनिक सांडपाणी, उग्र वास यामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नागरिक रोजच हैराण असतात. यातच सोमवारी नवीनच समस्या नागरिकांसाठी डोकेदुखीची ठरली. दुपारी अचानक एम्स रुग्णालय परिसर, सोनारपाडा, मिलापनगर, डोंबिवली नागरी बँक, मालवण किनारा हॉटेल परिसरातील वाहने, दुकाने, शेड तसेच नागरिकांच्या कपड्यावर हवेतून काळया रंगाचे ठिपके पडू लागले. यामुळे नागरिक धास्तावले. वाहने, कपड्यांवर पडलेले काळे ठिपके धुऊनही जात नाहीत. त्यामुळे डोंबिवलीकर चिंतेत आहेत.

वादळी पावसामुळे रसायन हवेत मिसळले
दोन दिवसांपूर्वी डॉमबिवलीत वादळी पाऊस झाला होता. त्यामुळे वाऱ्याच्या दिशेने केमिकल कंपनीतील रसायन हवेत मिसळून काळे डाग पडल्याचा अंदाज आहे. काळे ठिपके केवळ एका भागापुरते मर्यादित न राहता एमआयडीसी परिसरातील विविध भागांत दिसून आले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी उज्ज्वला वाडेकर, कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी, राजू नलावडे यांनी विविध ठिकाणी फिरून काळ्या ठिपक्यांची माहिती घेतली आहे.