अमुदान कंपनीत स्फोट होऊन 13 कामगारांचा बळी गेला. तीन वर्षांत अशा तब्बल 19 दुर्घटना घडून 19 जणांचा बळी गेला असून शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत. अशातच आता औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने माहिती अधिकारात दिलेल्या धक्कादायक आकडेवारीवरून डोंबिवलीत धोकादायक कंपन्यांची संख्या 460 वर गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डोंबिवली शहर ‘गॅस चेंबर’च झाले असून एखादा मोठा धमाका झाल्यास संपूर्ण शहरच बेचिराख होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
23 मे 2024 रोजी डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत आगीचा भडका उडून मोठा स्फोट झाला. यात 13 कामगारांचा बळी गेला होता. दरम्यान कंपन्यांतील स्फोटानंतर सरकार चौकशीचे आदेश देते. परंतु नंतर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने कारखानदार सुरक्षेचे नियम पायदळी तुडवत असून स्फोटासारख्या घटना वारंवार घडत आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने यानंतर दिलेल्या माहितीत 171 कंपन्या अतिशय धोकादायक असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील रेड संवर्गातील 289 प्रदूषणकारी कंपन्यांची यादीच जाहीर केली आहे. त्यामुळे डोंबिवली एमआयडीसीत तब्बल 460 कंपन्या प्रदूषण व सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे उघड झाले आहे.
खटले दाखल होऊनही सुरक्षेच्या नावाने बोंब
डोंबिवली एमआयडीसीतील 17 कंपन्यांनी सुरक्षा नियमांचे कायदे पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे. याविरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर कारवाई करण्यात आली असून या सर्व कारखान्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही अनेक कारखान्यांमध्ये सुरक्षेच्या नावाने बोंबच असल्याने येथील सुरक्षा रामभरोसे आहे.
जीवाशी खेळणाऱ्या कंपन्यांचे स्थलांतर कधी?
स्फोटाच्या घटनांनंतर सरकारने धोकादायक कारखाने स्थलांतरित करण्याची घोषणा केली होती. मात्र याबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर सरकारला जाग येणार का, असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देण्याबाबत चालढकल होत असल्याचा आरोपदेखील राजू नलावडे यांनी केला आहे