डोंबिवली एमआयडीसीत चेंबरवरील झाकणे गायब

एमआयडीसीत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्त्यावरील चेंबरची झाकणे गायब झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बरेच चेंबर उघडे असल्याने स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनदेखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एकीकडे रस्ते काँक्रीटीकरण झाले असताना दुसरीकडे मात्र पेव्हर ब्लॉक, ड्रेनेज, पाइपलाइन आणि विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी उघड्या चेंबरमुळे अपघातांची संख्यादेखील वाढली आहे. काही दुचाकीस्वार या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत, तर या भागात मोठ्या प्रमाणात भंगारवाले फिरत असल्याने त्यांनीच झाकणे चोरून नेली असावीत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.