>> मधुकर ठाकूर
कुवैतवरून परतलेल्या एका इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने अटल सेतुवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (24) दुपारच्या सुमारास घडली. श्रीनिवास कुरुकुट्टी (38) असे या बेपत्ता इसमाचे नाव असून तो डोंबिवलीचा रहिवासी आहे. सध्या श्रीनिवास यांचा शोध सुरू असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.
डोंबिवलीतील श्रीनिवास कुरुकुट्टी कुवैत येथील एका खासगी कंपनीत काम करीत होते. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर म्हणून काम करीत असलेल्या श्रीनिवास यांनी ऑक्टोबर 2023 मध्येच कुवैत येथील जॉब सोडून डोंबिवलीत आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र व्यवसायात आलेल्या आर्थिक अडचणींमुळे श्रीनिवास वैफल्यग्रस्त झाले होते. मंगळवारी (24) दुपारी 12.30 वाजता नेक्सास या चारचाकी गाडीतून श्रीनिवास अटलसेतुवर आले होते. सेतुवर येताच चारचाकी पार्क करून इकडे तिकडे न पाहता सेतूवरुन थेट खवळलेल्या समुद्रात उडी घेतली. याआधीही कुवैतमध्ये काम करीत असतानाही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली असल्याचे न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी सांगितले.
अटलसेतुवरुन समुद्रात उडी घेऊन बेपत्ता झालेल्या श्रीनिवास यांचा सध्या शोध सुरू आहे. चार मच्छिमार बोटी, सागरी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे. मात्र खवळलेला समुद्र आणि खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे शोधमोहीमेला अद्यापही यश मिळाले नसल्याची माहिती बागवान यांनी दिली.