
65 बेकायदा इमारतीच्या प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच डोंबिवलीतील आयरे गावात बनावट कागदपत्रे बनवून सातबारा बनविल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत आता तहसीलदार सचिन शेजाळ यांनी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून मेसर्स साई डेव्हलपर्सने हा झोल केल्याचा आरोप होत असून अनधिकृत इमारती उभारलेल्या अन्य जागांवरील कागदपत्रे तपासण्याची मागणी नागरिकांनी केली आहे
कल्याण-डोंबिवलीत बोगस महारेरा नोंदणी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारलेल्या 65 इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणाच्या चौकशीदरम्यान डोंबिवलीतील आयरे गावात बनावट सातबारा उतारा तयार करताना भोगवटा वर्ग 2 वरून वर्ग 1 मध्ये बदलण्यात आल्याचे आढळले. या प्रकरणात तहसीलदारांनी साई डेव्हलपर्सचे भागीदार शालिक भगत याच्याविरोधात रामनगर पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्य ‘आका’ लवकरच तुरुंगात
पालिकेच्या हद्दीत बोगस कागदपत्रांवर बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. आता एका बिल्डरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लवकरच या प्रकरणातील मुख्य पालिकेच्या हद्दीत बोगस कागदपत्रांवर बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. आता एका बिल्डरविरोधात गुन्हा दाखल झाला ‘आका’ ही तुरुंगात जाईल, असा विश्वास शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.
चौकशी समितीची चौकशी करा
65 बेकायदा इमारत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने एक चौकशी समिती नेमली आहे. या समितीची एकही बैठक झाली नाही. समितीने तातडीने चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा अशी मागणी याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे. तसेच समितीची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
… तर त्यांच्यावरही कारवाईचा बडगा
मेसर्स साई डेव्हलपर्सच्या सर्व्हे नंबर 29/5 पै या सातबाराची माहिती घेतली असता २०२० मध्ये खरेदी दस्त बनावट पद्धतीचा असल्याचे निदर्शनास आले आहे. सातबारा भोगवटा वर्ग 2 चा असताना वर्ग 1 करण्यात आला आहे. आणखी तपासणी सुरू असून रेराकडून माहिती मागवली आहे. काही दस्तांची तपासणी चालू आहे. अशाप्रकारे बोगस सातबारा दाखवून अन्य परवानग्या घेतल्याचे आढळले तर त्यांच्यावरही आम्ही गुन्हे दाखल करणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.