नागोठण्यात पिसाळलेल्या कुत्र्याचे एकाच दिवसात सतरा जणांना चावे; लहान मुलांसह महिला, वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण

शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवसात सतरा जणांचे लचके तोडल्याची बाब समोर आली आहे. या कुत्र्याने शहरातील मीरानगर, आंगर आळी, जोगेश्वरी नगर, बाळासाहेब ठाकरे नगर, कोळीवाडासह विविध भागात दहशत माजवली आहे. या कुत्र्यामुळे परिसरातील लहान मुलांसह महिला व वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागोठण्यात बुधवारी सकाळपासूनच कुत्र्याने धुमाकूळ घातला. या कुत्र्याने रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांसह खेळणाऱ्या लहान मुलांचा चावा घेतला. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सतरा नागरिकांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले, तर गंभीर जखमी झालेल्या काहींना पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कुत्र्याने सतरा जणांचा चावा घेतल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून त्यांच्यावर योग्य ते उपचार केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट यांनी दिली.

नागरिकांना आवाहन

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पिसाळलेला कुत्रा फिरत असून त्याने अनेक जणांवर हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगून काळजी घ्यावी. तसेच हा कुत्रा दिसून आल्यास ग्रामपंचायत कार्यालयात कळवावे किंवा समाधान सोनावळे 9021613271 यांना संपर्क करावा असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.