ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 3 वर्षांच्या चिमुकलीवर पाचव्या मजल्यावरून कुत्रा पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अशा विचित्र घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. मुंब्रामधील अमृत नगर परिसरात 6 ऑगस्ट रोजी दुपारी एक 3 वर्षांची चिमुकली आपल्या आईसोबत रस्त्याच्याकडेने चालत होती. यादरम्यान अमृत नगरमध्ये चिराग मेंशन इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून एक कुत्रा अचानक खाली कोसळला आणि त्या चिमुकलीच्या अंगावर पडला. या घटनेत ती चिमुकली जागीच बेशुद्ध पडली. यामुळे तिची आई मुलीला घेऊन ताबडतोब डॉक्टरांकडे जाते. परंतु या अपघातात मुलीचा दुदैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर कुत्रा देखील खाली पडल्यानंतर काहीकाळ बेशुद्ध होता. परंतु थोड्यावेळाने कुत्रा जागेवरून उठल्याचे व्हिडीओद्वारे समोर आले आहे. कुत्र्यालाही दुखापत झाल्याने त्याला प्राणी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा कुत्रा मुंब्रामधील अमृत नगरमध्ये चिराग मेंशन इमारतीतील जैद सय्यद नामक व्यक्तीने पाळला होता.