महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेविरोधात डॉक्टर हायकोर्टात दाद मागणार, सुट्टीच्या दिवशी निवडणूक घेण्याची मागणी

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिल रोजी होणार आहे, परंतु तब्बल साडेआठ हजार डॉक्टर डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस आणि पाच हजार डॉक्टर हे पालिकेच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांत शिकवणारे आहेत. त्यामुळे त्यांना कामासाठी रजा घ्यावी लागेल. परिणामी रुग्णालयांतील काम ठप्प होऊन त्यांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन डॉक्टर संघटनांनी निवडणूक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी ठेवण्याची मागणी केली आहे, परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने अखेर डॉक्टरांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स मुंबई आणि हिलिंग हॅण्ड्स युनिटी पॅनलसह विविध संघटनांनी वारंवार निवेदन देऊन निवडणुकीची तारीख बदलण्याची विनंती केली, परंतु त्यांची ही विनंती मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याचे हिलिंग हॅण्ड्स युनिटी पॅनलचे समन्वयक डॉ. तुषार जगताप यांनी सांगितले. दुसरीकडे तब्बल 70 हजार डॉक्टरांना वगळण्यात आल्याचा मुद्दा अजूनही अनुत्तरित आहे. तर डॉक्टरांना नोंदणीसाठी मुदत दिली होती, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक डॉ. राकेश वाघमारे यांनी म्हटले आहे.

या निवडणुकीत चार पॅनेल आमने-सामने असणार आहेत.  इंडियन मेडिकल असोसिएशन, परिवर्तन पॅनेल, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट आणि हिलिंग अँड युनिटी पॅनल निवडणूक रिंगणात आहेत.

वगळलेले 50 हजारांहून अधिक डॉक्टर मराठी

नावे वगळण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये 50 हजारांहून अधिक डॉक्टर हे मराठी असून हे डॉक्टर उमेदवारीपासूनही वंचित राहणार आहेत. वैद्यकीय परिषदेकडे जवळपास दोन लाखांहून अधिक डॉक्टर नोंदणीपृत आहेत. 2022 मध्ये सर्व डॉक्टरांना नोंदणीसाठी वर्षभराची मुभा देण्यात आली होती, परंतु या कालावधीत सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. जवळपास सहा महिने हा बिघाड कायम होता. त्यामुळे डॉक्टरांना नोंदणी करता आली नाही. दरम्यान  अनेक डॉक्टरांना तारीख उलटून गेल्याचे लक्षात येत नाही. अशा वेळी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉक्टरांना कळवायला हवे होते, अशी डॉक्टरांची भूमिका आहे.