
राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) म्हणजेच जीबीएसचा धोका वाढता दिसत आहे. पुणे, मुंबईनंतर शनिवारी नागपुरात या आजारामुळे एकाचा मृत्यू झाला. हा आजार फक्त बॅक्टेरिया आणि वायरसमुळे नाही तर, अन्नपदार्थातूनही शरीरात जाऊ शकतो. तसेच मांसाहार खाल्ल्यानेही जीबीएस आजार होऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
याचबद्दल माहिती देताना डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सांगितलं की, ”नोरोव्हायरस जीबीएस सारखे विषाणू अन्नपदार्थातून आपल्या शरीरात जाऊ शकतात. यामुळे उलटी आणि जुलाब, असे आजार होऊ शकतात. मात्र हे आजार आपल्या प्रतिकारशक्तीने बरे होतात. हे आजार बरे होत असताना आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीत काही बदल घडतात. हे बदल घडल्यानंतर ही प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात बाहेरच्या येणाऱ्या गोष्टीं ऐवजी आपल्याच शरीरावर हल्ला करते. या प्रकरणात आपली प्रतिकारशक्ती मेंदू किंवा आपल्या मज्जातंतूवर हल्ला करते आणि ती अशक्त करायला लागते.”
डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणाले की, ”दूषित पाणी, अन्न किंवा मांसाहार यामधून ज्यांना उलटी आणि जुलाब सारखे आजार झाले, यातील काही जणांना जीबीएस आजाराची लागण झाली. मात्र मांसाहार केल्यामुळेच तुम्हाला जीबीएस आजार होतो का, तर असं नाही. प्रत्येकालाच मांसाहार खाल्ल्याने जीबीएस आजार होत नाही. मात्र काही जणांना हा आजार होऊ शकतो. यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दूषित मांस खाऊ नये किंवा उघड्यावरील अन्न खाऊ नये. तसेच पाणीही स्वच्छ पियावे, तसं न केल्यास इतर आजार होण्याचीही शक्यता असते.”